पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती सोहळा श्रीक्षेत्र चौंडी येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार

0
10

मुंबई, दि. ३० : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी दिनांक ३१ मे २०२३ रोजी त्यांचे जन्मगाव श्रीक्षेत्र चौंडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयंती सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यात अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मान होणार आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्रत्येकी १५ ग्रामपंचायतींमधील ६० पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मानसोहळा महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे दुपारी ३.०० वाजता  होणार  आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतलेला आहे.

या पुरस्कारासाठी राज्यातील एकूण २७,८९७ ग्रामपंचायतींमधील १,३९,४८५ महिलांनी अर्ज सादर केले होते. शासन निर्णयानुसार गठित समितीच्या माध्यमातून छाननी करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील सुमारे ५५,७९४ महिलांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ आणि रोख रक्कम रू. ५००/- देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतस्तरावर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामपंचातस्तरीय पुरस्कार विजेत्या कर्तबगार महिलांचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अभिनंदन केले आहे.

****

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here