पुणे, दि. 30: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकाचवेळी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या अभियानाअंतर्गत एका दिवसात 1 लाख 81 हजार 376 नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला. जिल्ह्याला दिलेल्या उद्दीष्टापेक्षा दुप्पट नागरिकांना अभियानांतर्गत लाभ देण्यात आल्याने अनेकांना समाधानाचे क्षण अनुभवता आले.
अभियानांतर्गत जिल्ह्याला 75 हजार नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे अभियान यशस्वीपणे राबविण्याच्यादृष्टीने महसूल तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्याला मिळालेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवेचा लाभ देण्याचा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्यादृष्टीने यंत्रणांनी विविध योजनांचा लाभ देण्यासाठी नागरिकांनाकडून अर्जही भरुन घेतले.
आज तालुकास्तरावरील शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजना व सेवेचा लाभ देण्यात आला. या सकाळी 11 वाजता शिबिरांना लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. काही ठिकाणी सभागृह तर काही ठिकाणी मंडप उभारून विविध यंत्रणांचा कक्ष स्थापन करण्यात आला होता. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आशेने आलेले नागरिक समाधानी होऊन परततांना दिसले. एकूण 1 लाख 81 हजार 376 नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला.
पुणे शहरात 10 हजार 929, हवेली 27 हजार 419, मुळशी 3 हजार 950, भोर 28 हजार 442, मावळ 3 हजार 68, वेल्हे 8 हजार 390, जुन्नर 3 हजार 523, खेड 10 हजार 837, आंबेगाव 24 हजार 203 शिरुर 33 हजार 223, बारामती 21 हजार 431, पुरंदर 5 हजार 517 आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड येथे 442 लाभार्थ्यांना शिबिराचा लाभ झाला.
शिबिरात महसूल, कृषि, आरोग्य, जलसंपदा, पशुसंवर्धन, पोस्ट, पंचायत समिती, निवडणूक शाखा, भूमी अभिलेख, सामाजिक वनीकरण, वन विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, एकात्मिक बालविकास विभाग, दुय्यम निबंधक सहकारी संस्था कार्यालय आदी विविध विभागांनी सहभाग घेतला. नागरिकांना शिधापत्रिका, दिव्यांग प्रमाणपत्र, विविध दाखले, मतदार नोंदणी, नवीन वीज जोडणी, आधारकार्ड अद्ययावत करणे या सेवांसह संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री सन्मान निधी योजना, मनरेगा, दिव्यांगांना आधार कार्ड, निर्वाह भत्ता, आदी शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी नागरिकांना शासकीय योजनांची माहितीदेखील देण्यात आली.
सूक्ष्म नियोजनावर भर
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी शिबिराचे सूक्ष्म नियोजन केले होते. तालुक्यातील विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून त्यांच्याकडील योजना, सेवा व लाभार्थ्यांची माहिती संकलीत करण्यात आली. तालुकास्तरावरील बैठकांमध्ये नियोजनाला अंतिम रूप देण्यात आले. उद्दीष्टापेक्षा अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी गेला आठवडाभर परिश्रम घेतले.
जागेवरच सेवा मिळाल्याचा आनंद
‘शासन आपल्या दारी’ अभियांनाअंतर्गत भोर तालुक्यातील देगावच्या नाईलकर कुटुंबांना प्रथमच महादेव कोळी जातीचा दाखल्याचे वाटप करण्यात आले. याबद्दल नाईलकर कुटुंबानी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले. हितेश खुटवळ यांच्या बाळाचे आधार कार्ड तात्काळ तयार झाल्याने त्यांना वेळ वाचल्याचे समाधान होतो. अशा अनेक समाधानाच्या प्रतिक्रीया शिबिरात ऐकायला मिळाल्या. ‘शासन आपल्या दारी उपक्रमात सर्व योजना एकाच छताखाली मिळत हायती..’ ही मांगदरीच्या लक्ष्मण मांगडे प्रतिक्रीया आणि पत्नीला दिव्यांगाचे कार्ड तात्काळ मिळाल्याने ‘शासनाचा उपक्रम लय भारी’ ही संपत मोहिते यांची प्रतिक्रीया शिबिराचे यश सांगणारी आहे.
डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी- शिबिराच्या माध्यमातून अधिक संख्येने नागरिकांना लाभ देण्याच्या आनंदाएवढेच ज्यांना लाभ मिळाला त्या सामान्य ग्रामीण भागातील नागरिकांचे कष्ट वाचले याचे समाधान जास्त आहे. सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी प्रयत्नपूर्वक चांगले नियोजन केले. यापुढेही असेच मोहिम स्तरावर सामान्य नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न असतील.
****