प्रति थेंब अधिक पीक

शेती हा निसर्गाच्या भरवशावर चालणारा व्यवसाय आहेअसे म्हटले जाते. निसर्गाच्या बेभरवशावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सिंचन व शेततळे यासारख्या योजना शेतकऱ्यांच्या मदतीला आल्या आहेत. राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक हे ध्येय घेऊन या योजना काम करतात. या योजनांची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना ठिबक सिंचन व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना तुषार सिंचन या दोन्ही योजनांचा उद्देश सिंचनाखालील लागवडीयोग्य क्षेत्र वाढविणे, उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता वाढविणे, पिकांच्या उत्पादनात व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, हा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व खातेदार शेतकरी पात्र लाभार्थी आहेत. मात्र, त्यांनी यापूर्वी त्याच क्षेत्रावर मागील ७ वर्षांत लाभ घेतलेला नसावा. यासाठी पाण्याचा स्त्रोत आवश्यक असून, ७/१२, ८ अ चा उतारा, संवर्ग प्रमाणपत्र (एससी, एसटीसाठी) ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

दोन्ही योजनांसाठी अनुदान : अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ८० % व इतर शेतकऱ्यांना खर्च मर्यादाच्या ७५% अनुदान देय आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून ५५% / ४५% व उर्वरित पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना २५% / ३०% देय आहे.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना ठिबक सिंचन योजनेची खर्च मर्यादा :  

अ.क्र अंतर (मि. मी. मध्ये) क्षेत्र 0.2 हे. क्षेत्र 0.4 हे. क्षेत्र 1 हे.
1 १.२ x ०.६ ३१४३६ रू. ५७२४१ रू. १२७५०१ रू.
2 १.८ x ०.६ २४५६९ रू. ४२९९२ रू. ९१५६० रू.
3 १.५ x १.५ २८१०६ रू. ४६९९५ रू. ९७२४५ रू.
4 ३ x ३ १५७९२ रू. २६१९० रू. ४७७५१ रू.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना तुषार सिंचन खर्च मर्यादा :    

 

क्षेत्र पाईपचा व्यास (Pipe Dia) मि. मी. मध्ये
  63 75 90
0.4 हे.पर्यंत 13211 रू. लागू नाही लागू नाही
1 हे. पर्यंत 21588 रू. 24194 रू. 0
2 हे. पर्यंत 31167 रू. 34657 रू. 0
3 हे. पर्यंत लागू नाही लागू नाही 46779 रू.
4 हे. पर्यंत लागू नाही लागू नाही 58995 रू.
5 हे. पर्यंत लागू नाही लागू नाही 66789 रू.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे –

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक असून, ती जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. या योजनेसाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडतीनुसार लाभ देण्यात येतो.

शेततळ्यासाठी आकारमान : या योजनेअंतर्गत शेततळ्याच्या आकारमानानुसार देय होणारी अनुदानाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. अनुदानाची कमाल रक्कम रुपये 75000 इतकी राहील. त्यापेक्षा जास्त खर्च झाल्यास सदर अतिरीक्त खर्च संबंधित लाभार्थीने स्वतः करणे अनिवार्य राहील.

अर्ज सादर करण्याची पद्धत : अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून महाडीबीटी पोर्टलचे http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा, शेतकरी स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र CSC ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण –

फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचन सुविधा निर्माण करणे, दुष्काळी भागांमध्ये फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. यासाठी मनरेगा, आरकेव्हीव्हाय, मागेल त्याला शेततळे, इतर योजना व स्वखर्चाने खोदकाम केलेल्या तळ्यांना प्लास्टीक अस्तरीकरण करणारे शेतकरी हे पात्र लाभार्थी आहेत. तर ७/१२, ८ अ, आधार कार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, संवर्ग प्रमाणपत्र (अनु.जाती व अनु.जमाती प्रवर्गाकरिता) ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

आकारमान व अनुदान

अ.क्र आकारमान प्रकल्प खर्च रक्कम रूपये अनुदान रक्कम रू.
१५x१५x३ ५६५५१/- २८२७५/-
२०x१५ x ३ ६३१९६/- ३१५९८/-
२०x२०x३ ८२४३६/- ४१२१८/-
२५x२०x३ ९९३४२/- ४९६७१/-
२५x२५ x ३ ११७३९९/ ५८७००/-
३०x२५ x ३ १३५४५७/- ६७७२८/-
३०x३०x३ १५६१२७/- ७५०००/-

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (सामूहिक शेततळे) –

फलोत्पादन व (फळे, फुले, भाजीपाला, मसाला पिके ई.) पिके असणारे संबंधित शेतकरी समूह या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. त्यासाठी ७/१२, ८ अ चा नमुना, आधार कार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खाते पास बुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, हमीपत्र, संवर्ग प्रमाणपत्र ( अनु. जाती व अनु. जमाती करिता ) ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

३४ x ३४ x ४.७० मीटर आकारमानाच्या सामूहिक शेततळ्यासाठी रक्कम रूपये ३.३९ लाख असे १०० टक्के अनुदान आहे. २४ × २४ × ४ मीटर आकारमानाच्या सामूहिक शेततळ्यासाठी रक्कम रूपये १.७५ लाख असे १०० टक्के अनुदान आहे.

अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा.

(संकलन – उपमाहिती कार्यालयपंढरपूर)