रत्नागिरी दि 1 (जिमाका):- येथील शिक्षण संस्थामधील महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृतीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर येत्या 30 जून पर्यंत कशा पद्धतीने वितरीत करता येईल याचे सुयोग्य नियोजन संबंधित विभागाने करावे, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज शिष्यवृत्ती वाटपाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
ते पुढे म्हणाले सन 2022-23 या वर्षाकरिता शिष्यवृत्तीची रक्कम जमा आहे. या शिष्यवृतीमध्ये 60 टक्के केंद्राचा तर राज्य सरकारचा 40 टक्के इतका वाटा आहे, विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती न पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. शिष्यवृत्तीपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. याच्या अनुषंगाने 10 जूनपर्यंत संस्था चालक, प्राचार्य यांची बैठक घेण्यात यावी अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली
समाज कल्याण विभागाने शिष्यवृत्ती वाटपाच्या अनुषंगाने गुगलशीटमध्ये सर्व माहिती भरून ती यादी अद्ययावत करावी, अशी सूचना जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी केली. या आढावा बैठकीसाठी अभिजित हेगशेट्ये अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जे. पी जाधव, सहा आयुक्त (समाज कल्याण) यादव गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) श्रीकांत व्हडे, (प्राथमिक) शिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
——