नागपूरचे ‘एम्स’ एनएबीएचची मान्यताप्राप्त देशातील पहिले रुग्णालय; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

0
10

नवी दिल्ली, १ : नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) हे देशातील  नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ॲण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (एनएबीएच) मानांकन प्राप्त करणारे पहिले रुग्णालय ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या एम्स रुग्णालयातील पथकाचे अभिनंदन केले.

‘एनएबीएच’ची मान्यता प्राप्त करणे या रुग्णालयासाठी महत्वाची पावती असून उच्च दर्जाची रुग्ण सेवा आणि सुरक्षितता प्रदान करण्याच्या रुग्णालयाच्या वचनबद्धतेचा हा दाखला आहे. ‘एनएबीएच’ची मान्यता हे आरोग्य सेवेच्या गुणवत्तेसाठी जागतिकस्तरावर मान्यताप्राप्त मानाकंन आहे. ही मान्यता मिळणे हा कुठल्याही रूग्णालयासाठी मोठा सन्मान समजला जातो.

‘एनएबीएच’ची मान्यता प्रक्रिया कठोर आणि सर्वसमावेशक असते. यामध्ये रुग्णांची काळजी, सुरक्षितता आणि संस्थांत्मक कार्यक्षमतेसह विविध क्षेत्रांमध्ये रुग्णालयाच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते.  नागपूरच्या ‘एम्स’ रुग्णालयाने या सर्व मापदंडामध्ये उत्कृष्टतेची वचनबद्धता दाखवून ही मान्यता मिळविली आहे. ‘एम्स’ रुग्णालयाने एनएबीएचची मान्यता मिळवून आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

‘एम्स’ नागपूरबाबतचे ट्विट सामायिक करीत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी रुग्णालयाचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले आहे की, “या कामगिरीबद्दल एम्स नागपूरच्या  चमूचे अभिनंदन, ही कामगिरी  करत दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याचा एक मापदंड स्थापित केला आहे.” प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण डिसेंबर 2022 मध्ये झाले होते.

नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH) ही भारतीय गुणवत्ता परिषदेची एक घटक आहे. याची स्थापना आरोग्य सेवा संस्थांसाठी मान्यता प्रदान करणे व संचालित करणे यासाठी करण्यात आली आहे. एनएबीएच मंडळाचे कार्य  स्वायत्त आहे. आरोग्य सुविधांच्या मान्यतेसह ही संस्था उत्कृष्ट परिचारिका घडविण्यास प्रोत्साहन देत असते. प्रयोगशाळा प्रमाणन उपक्रम राबविते, गुणवत्ता आणि रूग्णांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यशाळा, व्याख्याने आयोजित करीत असते.

000

अंजु निमसरकर/वि.वृ.क्र.98 /दि.01.6.2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here