महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून दहावी उत्तीर्णांना शुभेच्छा

मुंबई दि. 2 : दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे. तसेच सर्वांना त्यांच्या पुढील यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आज दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या निकालाबाबत मंत्री श्री.विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. आपल्या आयुष्याच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा आपण पार केला आहे. आता पुढील जीवन कारकीर्द घडविण्यासाठी आपल्या आवडीच्या आणि योग्य क्षेत्राची निवड करावी, त्यासोबतच प्रामाणिकपणे परिश्रम घेऊन यशस्वी व्हावे. असा संदेश देत पुन्हा एकदा विद्यार्थी-विद्यार्थिनींसह त्यांच्या पालकांचे देखील अभिनंदन करीत असल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी म्हटले आहे. पालकांनी आपल्या मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांना आवडीचे क्षेत्र निवडताना सहकार्य करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असे समजून या परीक्षेत अपयश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता, सातत्याने प्रयत्न करीत यशास गवसणी घालावी, असे आवाहन मंत्री श्री. विखे पाटील यांनी केले आहे.

०००००

वर्षा आंधळे/विसंअ