नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

अमरावती, दि. 3 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थीकेंद्रीत असून यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. या शिक्षण पद्धतीत काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणाव्दारे आत्मनिर्भर करण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळणार असून विविध शाखेतील विषय निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना राहणार आहे. यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

श्री  शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता, नवीन वास्तूचे लोकार्पण व ‘अमृतघन’ ग्रंथाचे विमोचन या निमित्त संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभाताई खोडके, माजी  आमदार बी.टी. देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष गजानन फुंडकर, शिक्षण संचालक डॉ. शैलैंद्र देवळाणकर, सहसंचालक नलिनी टेंभेकर, श्री. शिवाजी ‍शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. व्हि. गो. ठाकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मंत्री  महोदयांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, शिक्षण व कृषी क्षेत्रासाठी शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी सुरू केलेल्या श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या ज्ञानगंगेचा लाभ विदर्भातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना झाला.

तरुणांचा देश म्हणून जगात भारताची ओळख आहे. भारतीय तरुण मेहनती आणि प्रामाणिक आहे. आज परदेशामध्ये उच्च पदांवरती भारतीय वंशाचे नागरिक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जगात आवश्यक असलेले शिक्षण येथील विद्यार्थ्यांना द्यावे यासाठी नवीन शैक्षणिक धोरण शासनाने जाहीर केले आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे पाऊल आहे. यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष, व्यावसायिक शिक्षणाची आवश्यकता याचा विचार करण्यात आला आहे. व्यावसायिक कौशल्य प्राप्त केल्यामुळे विद्यार्थी लवकरच आपल्या पायावर उभा राहाणार आहे. यामध्ये व्यावसायिक शिक्षण विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी योग, ध्यान, नृत्य आदी आवडीचे विषयाही शिकता येतील. या विविध क्षेत्रात मिळविलेले गुण त्यांच्या डिजीटल बँकेत जमा होणार आहेत. या जमा झालेल्या क्रेडीटच्या आधारे विद्यार्थी पूर्ण शिक्षण झाल्यावरही आपली विषय शाखा बदलू शकतो. अशाप्रकारे नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थीकेंद्रीत आहे. संस्थेनेही स्वायत्ततेकडे वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी केले.

श्री पोटे पाटील व श्रीमती खोडके यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभरात महाविद्यालयाने विविध समाजोपयोगी, विद्यार्थीकेंद्रीत उपक्रम घेण्यात आल्याची माहिती दिली. त्यांनी  संस्थेची कार्यशैली व प्रगतीची माहिती दिली.

पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मंत्री महोदयांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.  कार्यक्रमाच्या सुरवातीला ‘अमृतघन’ या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. तत्पूर्वी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. या परिसरात मंत्री महोदयांच्या हस्ते वडाचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण  प्राचार्य डॉ. रामेश्वर भुसे यांनी प्रास्ताविक दिलीप इंगोले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. राजेश मिरगे यांनी केले.