सुलोचनादीदी यांच्या निधनाने एक महान कलाकार गमावला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई, दि.4 :  तीनशेहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सुलोचनादीदी यांच्या निधनाने एका सदाबहार व्यक्तिमत्वाला आणि महान कलाकाराला आज महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्याही काळात आघाडीच्या अभिनेत्री म्हणून त्यांनी मोठा कालखंड गाजवला आणि त्यानंतर सुद्धा सातत्याने विविध भूमिका त्यांनी साकार केल्या. जवळजवळ 50 हून अधिक वर्ष त्यांनी चित्रपटाचा पडदा गाजविला. व्यक्तिरेखा हुबेहूब जिवंत करणाऱ्या वात्सल्यमूर्ती आणि एका महान कलावंताला आज आपण सारे मुकलो आहोत.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.

00000