पुणे, दि. ५: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात आयोजित महारोजगार मेळाव्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. रोजगारासाठी नवनवीन क्षेत्र उपलब्ध असून तरुणांनी मेळाव्याच्या माध्यमातून त्यांची माहिती करून घ्यावी आणि या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला आमदार सुनिल कांबळे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, महेश पुंडे उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, वर्षानुवर्षे पदवी शिक्षण म्हणजेच करिअरची सुरुवात अशी धारणा आहे. परंतु विविध प्रकारची कौशल्ये आत्मसात करण्यासाठी कमी कालावधीचे व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यातूनही युवकांना स्वत:चा विकास साधता येईल. पारंपरिक प्रशिक्षणाशिवायही अनेक नवनवीन क्षेत्र उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.पाटील म्हणाले. राज्य शासनाच्यावतीने २८८ मतदार संघात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात करिअर मार्गदर्शन शिबीर व रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. लोकप्रतिनिधींनी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाचे ७५ हजार नागरिकांना नोकरी देण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र शासनाने परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याकरता दरवर्षी ३० लाख रुपये शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. पाच वर्षामध्ये दीड कोटी रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. युपीएससीच्या तयारी राज्य शासनामार्फत दिल्ली येथे शिक्षणाची व राहण्याची सोय करण्यात येते. एमपीएससीसाठी गरीब मुलांचे शुल्क शासन माफ करते. तरुणांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध झालेल्या तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
महारोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000