किल्ल्यांचे जतन, संवर्धनावर भर देणार – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. ५ : राज्यातील गडकिल्ले इतिहासाचे साक्षीदार असून नव्या पिढीला त्याचे महत्त्व समजावे यासाठी किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनावर राज्य शासन भर देत आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघही किल्ले जतन, संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करत आहे, असे मत पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्यांच्या प्रमाणबद्ध प्रतिकृतींचे प्रदर्शन मंत्रालयात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पर्यटन मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करण्यात आले.

प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष माधव फडके, कार्याध्यक्ष ऋषिकेश फडके उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्यांच्या प्रमाणबद्ध प्रतिकृती प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या दोन्ही किल्ल्यांचा इतिहास, आरमाराची माहिती देण्यात आली आहे. सोमवार दि. 5 जून ते मंगळवार दि. 6 जून 2023 या दोन दिवसांच्या कालावधीत हे प्रदर्शन शिवप्रेमींना पाहता येणार आहे. या प्रदर्शनाची निर्मिती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली आहे.

000

संध्या गरवारे/विसंअ/