इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी १६ जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ६ : जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (इयत्ता दहावी) पुरवणी परीक्षेसाठीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यास १६ जून २०२३ पर्यंत मुदत आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

दहावीच्या परीक्षेचा निकाल या महिन्यात जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्ट २०२३ मध्ये होईल. या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय विषय घेवून प्रवीष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे, Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रवीष्ट होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने दहावीसाठी www.mahasscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत. नियमित शुल्कासह १६ जून २०२३ पर्यंत, तर विलंब शुल्कासह २१ जून २०२३ पर्यंत अर्ज सादर करता येईल. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं/