मुंबई, दि. 14 : आषाढी एकादशीला पंढरपूर येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. शेजारच्या राज्यांमधील भाविकांचाही त्यामध्ये समावेश असतो. यंदाच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे. या दिंडीमधील वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, पंढरपूर येथे आल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याची आरोग्य तपासणी व्हावी, आपात्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा तात्काळ मिळावी, या उद्देशाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.
पंढरपूरकडे येणाऱ्या दिंडीमध्ये दिंडीच्या सुरूवातीलाच एक हजार आरोग्य किटचे वाटप केले असल्याचे सांगत मंत्री श्री. सावंत म्हणाले, दिंडी मार्गस्थ झाल्यानंतर दिंडीसोबत प्रत्येकी दोन किलोमीटर अंतरावर एक आरोग्य पथक असणार आहे. यामध्ये आरोग्यदूत वारकऱ्यांसोबत असतील. या पथकांची संख्या 127 आहे. पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत 24 तास फिरती वैद्यकीय आरोग्य पथके कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. तसेच औषधोपचारासाठी तात्पुरते दवाखाने उभारण्यात आले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत 3 रूग्णवाहिका पथके, तर श्री संत तुकाराम महाराज पालखीसोबत 4 रूग्णवाहिका पथके असणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी 75 शासकीय रूग्णवाहिका पालखीसोबत कार्यरत असणार आहेत.
मंत्री श्री. सावंत पुढे म्हणाले, पालखी मार्गावर सर्व 1921 हॉटेलमधील कामगार व पाण्याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच 156 टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे पालखी मुक्कामाचे ठिकाणी तीन दिवसांपूर्वी व एक दिवस आधी धूरफवारणी करण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील आरोग्य संस्थेमार्फत जैवकचरा विल्हेवाटीचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य संदेश देणारे तीन चित्ररथ, तीन पथनाट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पालखीसोबत 30 बाईक ॲम्बुलन्सही असणार आहे. अशा पद्धतीने पहिल्यांदाच एवढ्या सूक्ष्म नियोजन पद्धतीने आरोग्याच्या वारीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन
आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान 27, 28 व 29 जून 2023 रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर पंढरपूर येथील वाखरी, गोपाळपूर व 65 एकर तिन रस्ता याठिकाणी आयोजित केले जाणार आहे. या शिबिरास राज्यातून खाजगी व सरकारी असे एकत्रितपणे 9 हजार डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी मोफत आरोग्य सेवा पुरविणार आहे. वारकऱ्यांची सुरूवातीस तपासणी, रोग आढळून आल्यास त्वरित उपचार, विनामूल्य औषधे, गरज असल्यास मोफत संदर्भ सेवा महात्मा फुले प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमार्फत मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. दृष्टीदोष असणाऱ्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार असून 5 लक्ष चष्मे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच मोतिबिंदू असणाऱ्या रूग्णांची मोफत शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे. पालखी तळावर जाऊन सर्व वारकऱ्यांना प्रत्येक 2 किलोमीटर अंतरावर ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मार्फत मोफत तपासणी व औषधे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहितीही मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
यासोबतच मंत्री श्री. सावंत विभागाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना म्हणाले, “राज्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ राबविण्यात आले. या अभियानातून 2 कोटी 39 लाख माता-भगिनींची तपासणी करण्यात आली. आजारांचे निदान झालेल्या 52 हजार महिलांवर उपचार करण्यात आले. तसेच ‘जागरूक पालक – सुदृढ बालक’ अभियानही राबविण्यात आले. यामध्ये वयानुसार तीन टप्प्यात बालकांची तपासणी करण्यात आली. वय वर्ष 0 ते 18 वयोगटातील बालके, किशोरवयीन यांची तपासणी करण्यात आली. भविष्यात 18 वर्षांवरील सर्व पुरूषांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. उपकेंद्रापासून ते जिल्हा रूग्णालयापर्यंत ‘सुंदर माझा दवाखाना’ स्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्रत्येक शनिवारी स्वच्छता अभियान यापुढे राबविले जाणार आहे.”
०००००
निलेश तायडे/स.सं