विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची ओळख करून देणे आवश्यक – केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह

पुणे दि.19: लिहिण्याची-वाचण्याची क्षमता आणि अंकाद्वारे मूलभूत व्यवहार करणे हा भविष्यातील शालेय शिक्षणासाठी आणि जीवन विकासासाठी आवश्यक पाया आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची ओळख करून देणे आणि त्यासाठी स्पष्ट उद्देश समोर ठेवून तातडीने उपाययोजना करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण व परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे जी-20 शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीनिमित्त ‘संमिश्र शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची शाश्वती’ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क सुकाणू समितीचे सदस्य प्रा.मंजुल भार्गव, केंद्रीय उच्च शिक्षण सचिव संजय मूर्ती, केंद्रीय शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, केंद्रीय कौशल्य विकास सचिव अतुल कुमार, युनिसेफचे चिफ ऑफ एज्युकेशन टेरी डर्नीअन, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.सुरेश गोसावी आदी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री.सिंह म्हणाले, ‘संमिश्र शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची शाश्वती’ हा विषय शिक्षण कार्यगटाच्या प्राधान्याच्या विषयापैकी एक आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची (एफएलएन) ओळख नसल्याची बाब विविध सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर आली आहे. ‘एफएलएन’च्यादृष्टीने मूलभूत कौशल्यावर  आधारीत कृतियोजना निश्चित करण्यासाठी गरज आहे. अध्ययन आणि अध्यापनाचा दृष्टीकोन, पालक व समाजघटकांची भूमिका आणि शिक्षकांची क्षमतावृद्धी आणि प्रशिक्षण या तीन उद्दीष्टांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राच्या अध्ययनासाठी मुलांना सहाय्यभूत ठरणाऱ्या  आणि त्यासाठी वातावरण निर्मितीत उपयुक्त ठरणाऱ्या उत्तम कल्पना चर्चासत्राच्या माध्यमातून पुढे याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता विकासावर भर देण्यात आला आहे. शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची उत्तम प्रकारे ओळख व्हावी यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. 2025 पर्यंत मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट कालबद्धरित्या गाठण्यासाठी भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कार्यक्रम आखला आहे. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कालावधीत शिक्षण क्षेत्रातील त्रुटींवर लक्ष केंद्रित करून त्या दूर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीद्वारे पुण्यातून शिक्षण पद्धती अधिक सहज, समावेशक आणि नाविन्यपूर्ण करण्यासाठीचा  संदेश दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रा.भार्गव म्हणाले, भूक आणि दारिद्र्याची समस्या दूर करण्यासाठी मुलांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे. याबाबतीत मागे पडल्याने शाळा सोडण्याचे प्रमाण वाढते. जगातील 56 टक्के आणि युरोपासारख्या प्रगत भागातही या विषयाचे ज्ञान नसलेल्यांची संख्या 14 टक्के आहे. विद्यार्थ्यांचे योग्य अध्ययन, प्रयोगशीलता, नवनिर्मितीचे ज्ञान आणि कौशल्य विकसित केल्यास शाश्वत विकासाचे उद्दीष्ट गाठता येईल. त्यासाठी वैशिष्ठ्यपूर्ण अभ्यासक्रमावर भर देत शिक्षकांची अध्यापन क्षमताही विकसीत करावी लागेल.

विद्यार्थ्यांच्या संतुलित आहार आणि आरोग्यावर भर दिल्यास शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल. लवचिक, बहुपर्यायी, मनोरंजक, क्रियाशीलतेवर आधारीत, आणि शोधप्रवृत्तीला चालना देणारा अभ्यासक्रम विकसीत करणे, लहान वयात विविध भाषांची ओळख करून देणे, तंत्रज्ञानाचा वापर निश्चित करणे आणि पूर्व प्राथमिक शिक्षणावर एकूण शिक्षण खर्चाच्या 10 टक्के खर्च करणे ‘एफएलएन’ साठी आवश्यक आहे असेही प्रा. भार्गव यांनी सांगितले.

युनिसेफचे चिफ ऑफ एज्युकेशन टेरी डर्नीअन यांनीदेखील ’मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावर सादरीकरण केले.  विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसीत होण्यासाठी शिक्षणातील नाविन्यता, विविध घटकात समन्वय आणि नव्या शैक्षणिक पद्धती आवश्यक आहेत.  विद्यार्थ्यांचा प्रवासाचा वेळ कमी करणे, पूर्व प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, शैक्षणिक साहित्याची उपलब्धता, शिक्षणाच्या गुणवत्तावृद्धीसाठी कार्यक्रम आखणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात शिक्षण सचिव संजय कुमार यांनी चर्चासत्राविषयी माहिती दिली. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारताच्या अध्यक्षतेखालील जी-20 परिषदेच्या घोषवाक्यानुसार जगभरात सर्वत्र समानरितीने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यादृष्टीकोनातून कार्यगटाच्या पहिल्या तीन बैठकांमध्ये चर्चा करण्यात आली. चौथ्या बैठकीत ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावर चर्चा होणार असल्याने देशभरातील साडेचार कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांपर्यंत हा विषय पोहोचविण्यात आला आहे. यानिमित्ताने आयोजित प्रदर्शनात 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील उत्तम शैक्षणिक संकल्पना प्रदर्शित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

चर्चासत्राला जी-20 शिक्षण कार्यगटाच्या बैठकीसाठी आलेले सदस्य आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित होते.

पाहुण्यांचे महाराष्ट्रीय पद्धतीने स्वागत

यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधला. बैठकीस उपस्थित झालेल्या परदेशी प्रतिनिधींचे ढोल ताशांचा गजरात स्वागत करण्यात आले.