आपत्ती व्यवस्थापन व शोध बचाव पथकाचे विभागीय आयुक्तांकडून कौतुक

0
7

अमरावती, दि. 19 : पूर प्रसंग, आगीची घटना व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जीवितहानी न होता, काय खबरदारी घ्यावी, यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच महापालिका अग्निशमन दलाने प्रात्यक्षिके सादर करुन त्यासंबधी माहिती दिली.

आगीच्या दुर्घटनांमध्ये बहुसंख्य वेळेस मानवाचा निष्काळजीपणा हे कारण दिसून आले आहे. गॅस गळतीमुळे व वीजेच्या तारेतील शॉर्ट सर्किटमुळे आगीच्या घटना घडल्याचे आढळून आले आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी गॅस सिलेंडर व त्याचे रेग्युलेटर व्यवस्थित बंद करावे. गॅसची गळती होत नाही याची खात्री करावी. घरातील जुन्या वायरिंग व विद्युत उपकरणांची दुरुस्ती व व्यवस्थापन सुस्थितीत ठेवावे. घर, कार्यालय, हॉटेल तसेच सार्वजनिक ठिकाणी संकटकालीन बाहेर पडण्याचा मार्ग नेहमी पर्याय ठेवावा. अग्नीशामक नळकांडे ठेवून त्याचा उपयोग कसा करावा याबाबत प्रशिक्षण व सराव करावा, असे मार्गदर्शन महापालीका अग्नीशमन दलाचे प्रमुख सय्यद अनवर यांनी मॉक ड्रील प्रसंगी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज नैसर्गिक आपत्ती उद्भल्यास बचावासाठी करावयाच्या उपाययोजनां संबधी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या उपस्थितीत मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अग्निशमन नळकांड्याव्दारे आग विझविण्याचे विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले व बचावासाठीच्या उपाययोजना व साधने दाखविण्यात आली.

आग विझविण्यासाठीचे अग्निशमन यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण व सराव प्रत्येकाने आत्मसात करणे आवश्यक आहे. आग विझविण्यासाठी आवश्यक असणारी साधने तसेच वेळेवर उपलब्ध सामुग्रीचा उपयोग कसा करावा यांसदर्भात माहितीचा अभाव असल्याने आगीच्या घटना आढळून येत असल्याचे मत विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी व्यक्त केले. मागीलवर्षी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथकाने पूराच्या पाण्यातून 87 लोकांचे जीव वाचवून जीवनदान दिले. तसेच 43 मृतदेह शोधून काढले त्यानिमित्त विभागीय आयुक्तांनी बचाव पथकाच्या चमूचे कौतुक केले. महापालिका अग्निशमन दलाचे कार्यही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

आज आयोजित मॉक ड्रील मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. आपत्ती व्यवस्थापन चमूने बचाव पथकांची मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्ज, रोप बंडल, सर्च लाईट, मेगा फोन, ग्लोव्हज, रेनकोट, स्कूबा डायव्हिंग कीट, हेल्मेट आदी विविध साधनांचा आपत्तीच्या प्रसंगी कसा उपयोग होतो याचे प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here