पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये सर्व घटकांच्या भावनांचा विचार करावा – विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे

0
9

सोलापूर, दि. 20 (जि. मा. का.) : पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करताना वारकरी, भाविक, व्यापारी, नागरिक अशा सर्व घटकांच्या भावनांचा विचार करावा, अशा सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिल्या.

सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, पंढरपूरचे मुख्याधिकारी अरविंद माळी, देवस्थान समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औंसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सुनील उंबरे आदि उपस्थित होते.

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मंदिर विकासासाठी शासनाने मंजूर केलेल्या 73 कोटी रुपयांच्या निधीमुळे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व पंढरपूरच्या विकासाला चालना मिळणार आहे. या निधीतून मंदिराचे प्राचीन सौंदर्य उजळून निघेल. त्याच बरोबर मंदिराचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. या निधीचा सुयोग्य वापर करावा. या तरतुदीमुळे संत विद्यापीठ, वारकऱ्यांना आरोग्य विषयक सुविधा, भक्त निवास अशा प्रलंबित विषयांना गती मिळणार आहे. त्याच बरोबर शिर्डी प्रमाणे पंढरपूरला विमानतळासाठी प्रस्तावावर आवश्यक कार्यवाही करावी. त्यामुळे जगभरातील भाविक पंढरपूरशी जोडला जाईल. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर आवश्यक कार्यवाहीसाठी सहकार्य करू, असे मत त्यांनी व्यक्त केले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पंढरपूर कॉरीडोर ऐवजी प्रति पंढरपूर ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवावी. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन विकास आराखडा अंतिम करावा. कोणावरही अन्याय होऊ न देता, सर्व घटकांना समाविष्ट करून घ्यावे. नागरिकांनाही सहकार्याची भूमिका घ्यावी. पंढरपूर विकास आराखडा तयार करताना जुन्या वास्तू, स्मारकांचा आदर राखला जाईल, याची विशेष दक्षता घ्यावी. कॉरीडोरबाबत गैरसमज दूर करणारे व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित करावेत, असे त्यांनी सूचित केले.

जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे यांनी सादरीकरण केले. यामध्ये तीर्थ क्षेत्र विकास आराखडा निर्मिती कार्यवाही, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात करावयाच्या पायाभूत सुविधा, पायाभूत विकास कामे, पालखी तळ भूसंपादन, झालेल्या बैठका, अभ्यास पथकाच्या सूचना, स्थानिक संघर्ष समितीचा आराखडा, आवश्यक निधी, सूचना व हरकती आदिबाबत सविस्तर माहिती दिली. त्यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले. संजय माळी, गजानन गुरव, अरविंद माळी यांनी त्यांच्या विभागासंदर्भात माहिती दिली.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here