पिंपरी चिंचवड येथील क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी ४१ कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.२०- पिंपरी चिंचवड येथे साकारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी चापेकर बंधूंचे स्मारक पूर्ण करण्यासाठी ४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते . बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखरसिंग, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे गिरीश प्रभुणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, क्रांतिकारी चापेकर बंधूचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून देण्यात येईल. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा.

यावेळी श्री. प्रभुणे यांनी स्मारकाच्या उभारणीची आतापर्यंतची वाटचाल मांडली. तसेच स्मारकाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी येण्यास मान्यता दिल्याचे सांगितले.

पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखरसिंह यांनी स्मारकाच्या कामाचे सादरीकरण केले.