कागदावरच्या योजना गरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान – कृषि मंत्री अब्दुल सत्तार

0
6
नांदेड (जिमाका) दि. 21 :- राज्यातील गोर-गरीब सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभ मिळावा, त्यांना विकासाची कास धरता यावी यासाठी शासन धरपडत असते. या योजना प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होईपर्यंत पूर्णत्व येत नाही. कागदावरच्या योजना प्रत्यक्ष गावकुसातील बांधावर राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान असल्याचे प्रतिपादन कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
येत्या 25 जून रोजी नांदेड येथील अबचलनगर येथे होणाऱ्या या भव्य उपक्रमाबाबत आज त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. एस. एम. महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी देवयानी, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
ज्यांच्यासाठी शासन योजना आखते, त्याला स्वरूप देते, त्यासाठी आर्थिक तरतूद करते त्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचवणे ही त्या-त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी हाच या उपक्रमापाठिमागचा उद्देश असल्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. शासन आपल्या दारीच्या महामेळाव्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शासकीय योजनांचा विश्वास घेता येईल. प्रत्येक विभागाचे स्टॉल्स याठिकाणी असल्याने नागरिकांना ज्या योजना हव्या असतील त्या योजनांबाबतची परिपूर्ण माहिती 25 जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमात त्या-त्या विभाग प्रमुखांकडून, अधिकाऱ्यांकडून करून घेता येईल, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यांच्या प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही, त्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही यासाठी संबंधित विभागाने आपआपले जबाबदार कर्मचारी देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. माझी मुलगी माझा अभिमान हा उपक्रम केवळ दारावर पाटी लावून चालणार नाही तर या पाठीमागचा जो मुळ उद्देश आहे तो जनसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुलीचे नाव केवळ पाटीपुरते नाही तर प्रॉपर्टी व शेतीच्या सातबारावर घेण्याचा हा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत त्यांनी प्रत्येक विभागनिहाय अधिकाऱ्यांकडून योजनांचा आढावा घेतला.
जिल्ह्यातील 103 महसूल मंडळात आजवर शासन आपल्या दारीबाबत शिबीरे झाली आहेत. तालुका पातळीवरील अधिकारी या शिबरांमधून नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख टिमवर्कने काम करत असून या योजनेत सहभागी होणारा प्रत्येक लाभार्थी, नागरीक हा महत्त्वाचा व्यक्ती असेल असे समजून नियोजन केले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here