खरीप हंगामातील पीक नियोजनाबाबत शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

0
4

पुणे, दि.21 : यावर्षी मान्सूनचे आगमन काहीसे लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना विशेष दक्षता घ्यावी. तसेच पेरणी संदर्भात नियोजन करावे. साधारणत: 80 ते 100 मि.मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, पेरणीची घाई करु नये, असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

आपत्कालीन पीक परिस्थितीत शेतकऱी बांधवांनी कशा प्रकारची काळजी घ्यावी यासंदर्भात कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली. याबैठकीत कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव, सर्व कृषि विद्यापिठांचे कुलगुरु त्याचप्रमाणे भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. हौसळीकर आदी उपस्थित होते. हवामान बदलानुसार सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे. त्यामुळे नवीन सामान्य पाऊस कालावधी (New Normal Mansoon period) हा 24 ते 25 जून असेल असा अंदाज वेधशाळेने सांगितला आहे. या हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24-25 जूननंतर अरबी समुद्रावरुन येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याने सर्वत्र चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक नियोजनासंदर्भात योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे.

योग्य पीक नियोजन

या नवीन सामान्य पाऊस कालावधीचा विचार करता शेतकऱ्यांनी पेरणी करताना लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी. पाऊस उशीरा आल्यामुळे शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करु नये. पेरणीसाठी साधारणपणे 20 टक्के जादा बियाणांचा वापर करावा. सलग संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी.

त्याप्रमाणे जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादन सारख्या तंत्राचा वापर करावा. हवामान खात्यामार्फत पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज दिला जातो. या पावसाच्या अंदाजाची माहिती प्रसिध्दी माध्यमांद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येईल. कृषि विद्यापीठ, कृषि विद्यापीठांचे संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र यांच्या सहाय्याने स्थानिक आपत्कालीन पीक नियोजन करण्यात येणार आहे. क्षेत्रीय यंत्रणांना या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्याबाबत सूचना कृषि विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

राज्यात मान्सूनचा अंदाज घेऊन पेरणीच्यावेळी पुरेशा प्रमाणात उत्तम दर्जाचे बी-बियाणे, खते व किटकनाशके शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार व रास्त दरात उपलब्ध करुन देण्याची खबरदारी कृषि विभागाकडून घेण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणाऱ्या कृषि निविष्ठांचा साठा उपलब्ध होईल यासाठी क्षेत्रीय यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून       1800-2334000 या टोलफ्री क्रमांकावर शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असेही कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी कळविले आहे.

कृषी आयुक्तालय अधिनस्त 2 हजार 70 कृषी सेवकांची पदभरती लवकरच 

कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त गट-क मधील विविध संवर्गातील सरळसेवा पदभरती बाबत प्रक्रिया सुरु झाली असून त्याची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पेसा क्षेत्रातील पदे निश्चित करण्याची कार्यवाही देखील अंतिम टप्प्यात आहे. या सरळसेवेच्या कोट्यातील 2 हजार 588 रिक्त पदे विचारात घेता याच्या 80 टक्के म्हणजे 2 हजार 70 कृषी सेवक पदासाठी प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी देण्यात आला आहे.  तो प्राप्त होताच जाहिरात व पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

कृषि विभागाचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झाला नसल्यामूळे शासन निर्णयातील तरतूदीनुसार वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून इतर सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादित पदभरती करण्यात येणार आहे. गट- क संवर्गातील सरळसेवा पदभरती आय. बी. पी. एस या कंपनीमार्फत राबविण्यास शासन मान्यता मिळाली आहे. या संस्थेसोबत सामंजस्य करार देखील करण्यात आला आहे. त्यानुसार वरिष्ठ लिपिक, सहायक अधिक्षक,  लघुलेखक ( निम्नश्रेणी) व लघुलेखक ( उच्चश्रेणी) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पेसा क्षेत्रातील पदे भरणार

        राज्यपाल महोदयांच्या दि. 29 ऑगस्ट 2019 च्या अधिसूचनेनुसार अनुसुचित / आदिवासी क्षेत्रातील          (पेसा) 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरणेबाबत कळविण्यात आले आहे. त्यामध्ये कृषि सहायक संवर्गाचा समावेश आहे. शासन निर्णयानुसार विभागीय कृषी सहसंचालक ठाणे, पुणे, नाशिक,अमरावती, नागपूर व लातूर या विभागातील पेसा क्षेत्रातील मुख्यालय निश्चिती व पदसंख्या निश्चित करण्याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय विभागाची मान्यता प्राप्त करुन घेणेबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कृषी सेवक पदांसाठी जाहिरात देणे शक्य झालेले नाही, मात्र मान्यता मिळताच भरती संदर्भातील पुढील कार्यवाही केली जाईल, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here