शेतकऱ्यांनो, बीज परीक्षण करा; उत्पादकता वाढवा

‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या तुकाराम महाराजांच्या ओवीप्रमाणे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात कोणत्याही पिकाची पेरणी अथवा लावणी करण्यापूर्वी ते शुद्ध आहे की नाही, याची खात्री करूनच ते बियाणे वापरले पाहीजे. बाजारात बरेचदा उपलब्ध होणाऱ्या भेसळ अथवा बोगस बियाण्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे पेरणी अथवा लागवड करण्यापूर्वी अशा बियाण्यांची उगवणक्षमता तपासून मगच त्याची लागवड केल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यांचे भविष्यात होणारे नुकसान टाळता येईल. त्याचा दुबार पेरणीसाठी लागणारा बियाणे, मजुरी आणि वेळेचा अपव्यय वाचेल. शेतकऱ्यांना शक्य असेल तर घरच्या घरी गोणपाटावर बियाण्यांची उगवणक्षमता तपासून घरगुती बियाणे वापरण्याचे नेहमी कृषि विभागाकडून आवाहन केले जाते. त्यामुळे शेतक-याला एकरी किंवा हेक्टरी किती  बियाणे वापरावे, याचा अंदाज येतो.

राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ योजनेतून शेतक-यांना अगदी नाममात्र शुल्कात त्यांच्या बियाण्यांची उगवणक्षमता तपासून घेता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी परभणी येथील पेडगाव रोडस्थित बीज परीक्षण केंद्रामधून आपले घरगुती बियाणे तपासून घ्यावे. शिवाय विकत घेतलेले बियाणे, त्याचा दर्जा, बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत शंका आल्यास बियाणे तपासणी करून घेऊ शकतात. यासाठी शेतक-यांनी आपले बियाणे एका पिशवीत बीज परीक्षण केंद्र, जुना पेडगाव रोड, परभणी येथे कार्यालयीन वेळेत आणून द्यावे. ते आपल्या बियाण्यांची नाममात्र (४० रुपये प्रती बियाणे) शुल्क भरून तपासणी करता येते. बीज परीक्षण केंद्रात तपासणीस आणलेल्या बियाण्याच्या नमुन्यावर शेतक-याने बियाणे, उत्पादक कंपनी, त्याची उगवणक्षमतेची कालमर्यादा, आपले नाव, गाव, संपूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांकासह परिपूर्ण माहिती भरावी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बियाण्यांची तपासणी झाल्यानंतर बीज परीक्षण केंद्राच्या कार्यालयाकडून आपल्याला अहवाल कळविणे सोपे जाईल.

शेतक-यांना पेरणी अथवा लागवडीपूर्वी बियाण्यांची शुद्धता तपासणीसाठी परभणी येथे बीज परीक्षण प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात आली असून, या प्रयोगशाळेत औरंगाबाद, परभणी महसूल विभागातील शेतकरी, बीजोत्पादक कंपनी, बीजप्रमाणीकरण यंत्रणा व बियाणे कायद्याअंतर्गत बीज नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेस एकूण २१ अधिकारी –कर्मचारी पदे मंजूर असून त्यामध्ये एक बीज परीक्षण अधिकारी, ३ कृषि अधिकारी, १ कृषि पर्यवेक्षक, ८ कृषि सहाय्यक, ३ प्रयोगशाळा सहाय्यक,  वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपीक प्रत्येकी एक व ३ चतुर्थश्रेणी कर्मचारी येथे कार्यरत आहेत.

प्रयोगशाळेत वीज नमुन्यांची शुध्दता व उगवणक्षमता तपासणी करण्यात येते. शुद्धतेमध्ये बीज नमुन्याची आर्द्रता, इतर पिकाची भेसळ, किडग्रस्त बियाणे तसेच इतर वाणाची भेसळ तपासण्यात येते. प्रयोगशाळेत कपाशीच्या बीटी वाणाचीसुद्धा तपासणी करण्यात येते. यामध्ये बीटी तपासणी, नॉन बीटी तपासणी व आरआयबी तपासणी करण्यात येते.

आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी प्रयोगशाळेला एकूण १७ हजार १९० बीज नमुने तपासणीचे लक्ष्यांक होते. परभणी येथील  प्रयोगशाळेने ३१ मार्च २०२३ पर्यंत २२ हजार ४२ बीज नमुन्यांची तपासणी करून १२८ टक्के लक्ष्यांक पूर्ण केला आहे. यामध्ये कायद्याअंतर्गत बीज नमुन्याचा ९ हजार ८८५ लक्ष्यांक असताना ९ हजार ८९ बीज नमुने तपासणी करण्यात आली. बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे ५ हजार ८२० बीज नमुने तपासणीचे लक्ष्यांक असताना १० हजार ९१ बीज नमुने तपासण्यात आले. तसेच शेतकरी व बीज उत्पादक कंपन्या यांचे १ हजार ४८५ बीज नमुन्यांचे लक्ष्यांक असताना २ हजार ३४ बीज नमुने तपासणी करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गंत शेतक-यांना बीज परीक्षण केंद्राकडून बीज परीक्षणाचे आवाहन करण्यात येत आहे. आतापर्यंत परभणी येथील प्रयोगशाळेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी शेतकरी व बीज उत्पादक कंपनी यांचा विश्वास संपादन केला आहे. वेळेत तपासणी करून देणे हे या प्रयोगशाळेचे वैशिष्ट्ये राहिले असून, चालू खरीप व येणारा रब्बी हंगाम विचारात घेता जास्तीत-जास्त शेतक-यांनी आपले बियाणे प्रयोगशाळेमार्फत तपासणी करून घ्यावे, असे आवाहन यांनी केले आहे.

*****

प्रभाकर बारहाते, माहिती अधिकारी

जिल्हा माहिती कार्यालय, परभणी