अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नॉन क्रिमी लेअर तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ

मुंबई, दि. 27 : विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब विचारात घेऊन इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून पोहोच पावती किंवा हमीपत्र घेऊन तीन महिन्यांची मुदतवाढ देऊन कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए), पुणे व पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इ. 11 वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येतात. सन 2023-24 ची इ. 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून प्रथम फेरीचे प्रवेश दिनांक 21 जून 2023 पासून सुरू करण्यात आले आहेत. इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तथापि विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/