कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करावा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. २७ : सातारा जिल्ह्यातील कसणी गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील गाव आहे. या गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संचालक श्री. रामानुजन, सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, सहायक वनसंरक्षक गणेश पाटोळे उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. वन्य प्राण्यांमुळे या गावातील शेती, पशुधन, मनुष्यहानीबाबत होणाऱ्या नुकसानीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीला सौर ऊर्जा कुंपण द्यावे. या गावाच्या पुनर्वसनाबाबत वन मंत्र्यासमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

****

शैलजा पाटील/विसंअ/