विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून शासनाची लक्षणीय कामगिरी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १२: मागील दोन वर्षात विविध क्षेत्रात राज्य सरकारने प्रकल्प हाती घेतले असून अटल सेतू, सागरी किनारा मार्ग, समृद्धी महामार्ग, मेट्रो, सिंचन आदी प्रकल्पांच्या माध्यमातून लक्षणीय कामगिरी केली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. अटल सेतू हा आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा सागरी सेतू असून अटल सेतू तसेच सागरी किनारा मार्ग हे केवळ मुंबईचेच नाही, तर भारताचा अभिमान असलेले प्रकल्प आहेत, असे त्यांनी सांगितले.

नियम 259 अन्वये मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला श्री.फडणवीस उत्तर देत होते. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या कामगिरीचा आढावा घेतला.

सिंचन आणि पाणी पुरवठा

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, शासनाने 123 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे ज्याची किंमत एक लाख 347 कोटी रुपये इतकी आहे. यामुळे 16 लाख 57 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. विदर्भातील सिंचनाचा मोठा अनुशेष दूर करण्यात येत आहे. महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला आता राज्यपालांनी मान्यता दिली आहे. मराठवाडा विभागात एकूण एक हजार 66 सिंचन प्रकल्प असून 948 पूर्ण झाले असून 11.88 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. कृष्णा कोयना, टेंभू या प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे. कोकणातील प्रकल्पांची कामेही करण्यात येत आहेत. समुद्रात वाहून जाणारे पाणी वळविण्यासाठी सल्लागार नियुक्तीचे काम प्रगतीपथावर आहे. नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे 10.64 टीएमसी पाणी मिळून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील जमीन सिंचनाखाली येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी

राज्यातील 84 लाख शेतकऱ्यांचे वीज पंप हे सात अश्वशक्तीच्या आतील आहेत. त्यामुळे सात अश्वशक्तीच्या आतील पंपांना वीज बिल माफी देण्यात आली आहे. मागेल त्याला सौप पंप योजना हाती घेतली आहे. यासाठी नऊ लाख पंप मंजूर करण्यात आले असून मागील वर्षीपर्यंतचे एक लाख 24 हजार 130 पंप दिले असून केवळ 30,821 पेड पेंडिंग राहिले आहेत, हे याच वर्षात दिले जाणार आहेत. कापूस आणि सोयाबीनच्या भावात कमतरता आल्याने राज्यातील 84 लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात मदतीचे पैसे देण्यात येणार आहेत.

रस्ते प्रकल्प

मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई शहर विभागात 396 किमीचे रस्त्यांच्या कामात कंत्राटदाराने निविदा अटीचे पालन न करणाऱ्या कंत्राटदाराचे काम रद्द करण्यात आले असून त्याला दंडही ठोठावण्यात आला. दुसऱ्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पश्चिम उपनगरात 516 किमी ची 216 कामे प्रगतीपथावर आहेत. पूर्व 182 किमीची 89 कामे सुरू होती यातील 19 कामे पूर्ण झाली आहेत. पहिल्या टप्प्यात 910 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो मुंबई महापालिकेच्या पैशातून करण्यात आलेला नाही, केवळ राजशिष्टाचाराच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेला खर्च करण्यात आलेला आहे.

भेंडीबाजार भागात अर्बन रिन्युअलचे उत्कृष्ट काम सुरू आहे. धारावीचे पुनर्वसन धारावीतच असेच नियोजन करून प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हा देशातला सर्वात मोठा नागरी विकास प्रकल्प सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

शिक्षक भरती प्रक्रियेत सुमारे 11,885 शिक्षकांची भरती झाली असून 6745 शिक्षक रुजू देखील झाले आहेत. शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. यातून शाळांच्या दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले. माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमामुळे शाळांमध्ये चांगली स्पर्धा निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.

कायदा व सुव्यवस्था

राज्यात गंभीर गुन्ह्यात तीन टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली असून दोषसिद्धीच्या प्रमाण 45 टक्के म्हणजेच 3.2 टक्क्यांनी वाढले आहे. प्रतिबंधात्मक कारवाईच्या संख्येत देखील वाढ झाली. डायल 112 वर पोलिसांचा प्रतिसाद कालावधी 2022 मधील 15.41 मिनिटांच्या तुलनेत आता 6.30 मिनिटांवर आला आहे. महिला अत्याचारामध्ये मे 2023 च्या तुलनेत 3.6 टक्क्यांची घट झाली आहे. तर गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण तीन टक्क्यांनी वाढले आहे. नागपुरमधील बेपत्ता झालेल्या मुलींपैकी परत आलेल्यांचे प्रमाण 97 टक्के असून नागपूरमधील परिस्थिती दाखविली जाते तितकी वाईट नसल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांविषयीच्या गुन्ह्यांच्या बाबतीत शासन अतिशय संवेदनशील असल्याचे त्यांनी सांगितले. वाळू माफियांवरील कारवाईमध्ये यावर्षी मे महिन्यापर्यंत 1849 जणांना अटक केल्याची माहिती त्यांनी दिली. मराठा आंदोलकांवर 31 जानेवारी 2024 पूर्वी दोषारोप दाखल झालेले 157 गुन्हे मागे घेण्याची शिफारस केली आहे. 53 गुन्हे मागे न घेण्याची शिफारस करण्यात आली आहे तर काही गुन्हे समितीच्या विचारार्थ असल्याचे ते म्हणाले. गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया असून दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी कोर्टात जावे लागते, ते परस्पर सरकारला मागे घेता येत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

पोलीस भरती

पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू असून दोन वर्षात जवळपास 42 हजार पोलिसांची भरती करण्यात येत आहे. 18 हजार पदांची भरती प्रकिया झाली असून 17 हजार पदांची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच आणखी नऊ हजार पोलीस भरतीची जाहिरात दिली जाणार आहे. पोलिसांसाठी निवासस्थाने बांधली जात असून त्यांच्या वैद्यकीय उपचारांची सोय करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. नवी मुंबईतील महापे येथे 837 कोटी रुपयांच्या खर्चाचा सायबर सिक्युरिटी प्रकल्प सुरू होत असून हा देशातील सर्वात डायनॅमिक प्रकल्प आहे. यामुळे बँकेतील गेलेले पैसे परत मिळवण्यातील रिस्पॉन्स टाइम कमी होण्यास मदत होणार आहे. इतर राज्यांनीही असा प्रकल्प सुरू करावा अशी सूचना केंद्र सरकारने इतर राज्यांना केली आहे. कोतवालांच्या मानधनात वाढ करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

000