छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये स्मारक उभारण्यामधील अडथळे दूर करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड, दि. २६ : छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये सर्वोत्तम असे स्मारक उभारण्यासाठी येत असलेले अडथळे दूर करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवरील याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयाकडे आणण्यात आले आहे. उच्च न्यायालयात पर्यावरण पूरक काम करून शिवस्मारक पूर्ण करण्यात येईल, अशी बाजू सरकारतर्फे पटवून देण्यात येईल. स्व. विनायक मेटे यांचे शिवस्मारक उभारणीचे स्वप्न पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

बीड येथे आयोजित स्व. विनायकराव मेटे यांच्या प्रथम जयंती कार्यक्रमप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. येथे आगमन झाल्यानंतर त्‍यांनी प्रथम स्व. विनायकराव मेटे यांच्या स्मृती स्थळास भेट दिली व पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री अतुल सावे,  खासदार प्रताप चिखलीकर,  आमदार नमिता मुंदडा, आमदार संदिप क्षीरसागर,  आमदार भारती लव्हेकर,  माजी मंत्री महादेव जानकर, प्रविण दरेकर, शिवसंग्रामच्या डॉ ज्योतीताई मेटे,  आशुतोष मेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर आगमनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले, मराठा आरक्षणासाठी दिलेला लढा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात स्मारक उभारण्यासाठी स्व.विनायकराव मेटे यांनी केलेले प्रयत्न बहुमोल आहेत. राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे आहे. या दृष्टीने विनायक मेटे काम करत होते. मराठा समाजातील गरीब व दुर्बल लोकांसाठी ते झटले. त्यांच्या प्रयत्नामुळे सारथी या शासकीय संस्थेच्या उभारणीत योगदान आहे. विद्यार्थ्यांचा विकास हे उद्दिष्ट ठेवून त्यांचे प्रयत्न सुरू होते. या सारखी संस्थेच्या माध्यमातून 103 विद्यार्थी मोठे यश संपादन करत त्यांची महत्त्वाच्या पदांवर निवड झाली आहे. त्यांच्या कार्याला पूर्ण करताना मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असा पुर्नउच्चार उपमुख्यमंत्री महोदयांनी केला.

ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देताना मेटेंचा थेट सहभाग होता. त्यांच्या विचारांच्या धर्तीवर काम करताना आरक्षणातून निवड झालेल्या उमेदवारांना संरक्षण देत नियुक्त करण्याचा मोठा ताकदीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यांच्या विविध कार्याबद्दलच्या आठवणी यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नमूद केल्या.

बीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस त्यांचे नाव देण्यात येणार असून त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी तेथे स्व. विनायक मेटे पुतळा उभारण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तसेच मुंबई जवळ अरबी समुद्रातील शिवस्मारक पूर्ण झाल्यानंतर सगळेजण नक्कीच यासाठी स्व. विनायक मेटे यांनी केलेल्या प्रयत्नांची आठवण काढतील व नाव घेतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री श्री.सावे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. बीड जिल्ह्याच्या विविध विकास कामांमध्ये त्यांचे योगदान ठळक दिसते आहे. मराठा आरक्षण यासह अनेक सामाजिक विषयांमध्ये त्यांनी दिलेला लढा महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्यानंतर हे समाजकार्य अविरत सुरु राहण्यासाठी आम्ही देखील मेटे परिवाराच्या पाठीशी उभे असून त्यांच्या कार्यात पाठिंबा देऊ, असे ते म्हणाले,

याप्रसंगी प्रवीण दरेकर, ज्योतीताई मेटे, तानाजीराव शिंदे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यासपीठावरील स्व. विनायक मेटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी आशुतोष मेटे यांनी बीड येथील नियोजित विद्यार्थी विद्यार्थिनी वस्तीगृहाच्या मागणी बाबत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना निवेदन दिले.

उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते यावेळी बीड जिल्ह्यातील लोकसत्ता चे जिल्हा प्रतिनिधी वसंत मुंडे यांचा लोकमत एक्सलन्स अवॉर्ड मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

 

या कार्यक्रमास माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार भीमराव धोंडे, अनिल जगताप, अशोक पाटील, कुंडलिक खांडे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

00000