ठाणे, दि. 3 (जिमाका) :- गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी देण्यात आला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिली.
राज्य शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त पालकमंत्री श्री. देसाई यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. आमदार सर्वश्री शांताराम मोरे, डॉ. बालाजी किणीकर, श्रीमती गीता जैन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
गेल्या वर्षभरात जिल्ह्यात झालेल्या विकास कामांची माहिती देऊन श्री. देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री म्हणून सोपविलेली जबाबदारी पार पाडताना जिल्ह्याच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून कामांना प्राधान्य दिले आहे. ठाणे जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठा समूह विकास प्रकल्प (क्लस्टर)ची सुरुवात नुकतीच मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झाली आहे. यातून सुमारे दहा हजार घरांची निर्मिती होणार आहे. याबरोबरच मीराभाईंदर, दिवा या क्षेत्रात सुद्धा क्लस्टर राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मेट्रो मार्गाचे जाळ्यामुळे वाहतूक सुविधा वाढण्यास मदत होणार असून वाहतुकीची कोंडी दूर होईल. वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग 4 या गायमुखपर्यंत वाढविण्यात येत आहे. ठाणे ते भिवंडी मेट्रो लाइन 5, ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, कल्याण – तळोजा मेट्रो 12, गायमुख ते मीरारोड या मेट्रो 10 आदी मेट्रोच्या कामांना गती मिळत आहे. याशिवाय तसेच विविध रस्ते विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. विरार -अलिबाग बहुउद्देशीय मार्ग, होण्यासाठी ऐरोली काटई नाका मुक्त मार्ग, ठाणे सागरी किनारा मार्ग, भिवंडी-कल्याण-शीळफाटा रस्त्याचे सहा पदरीकरण आदी कामे होत आहेत. याशिवाय कोपरी उड्डाणपूल, कळवा खारीगाव उड्डाणपूलाची उभारणी, मुंब्रा वाय जंक्शन उड्डाणपूल, कल्याणमधील पत्री पूल व दुर्गाडी पुलांची कामे झाली आहेत.
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियानाअंतर्गत शहरात रस्त्यांचे मजबूत जाळे उभारण्यात येत असून सुमारे 610 कोटींचा निधीतून 282 रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. हे सर्व रस्ते सिमेंटचे करण्यात येत आहेत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ९५% पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी जिल्हा रुग्णालयाचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमीपूजन झाले असून अद्ययावत सुविधा असलेले हे रुग्णालय ठाणे जिल्हा वासियांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीमार्फत ठाणे जिल्ह्याच्या निधीमध्ये भरघोस वाढ
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यास भरघोस निधी देण्यात आला आहे. सन 2022-23 या वर्षात जिल्ह्याला 618 कोटींचा नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. या संपूर्ण निधी खर्च करण्यात आला आहे. सन 2023-24 या वर्षीच्या 750 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून हा निधी आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सन 2023-24 या वर्षासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांनी ठाणे जिल्ह्यास भरीव निधी दिला असून जिल्ह्यासाठी 287 कोटींची वाढ शासनस्तरावर झाली आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत 132 कोटींची आहे, असेही श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे, नवी मुंबईत महाराष्ट्र भवन निर्मिती हे निर्णय या शासनाने घेतले आहेत. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरात एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी रु.138.20 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकास योजनेअंतर्गत महापालिकांना एकूण 1651.96 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील अंबरनाथ, कुळगाव बदलापूर व शहापूर नगरपरिषद/नगरपंचायती यांना विविध योजनेअंतर्गत सुमारे 104.46 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा
राज्य शासनाने शेतकरी हा केंद्र बिंदू मानून काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांना आता एक रुपयात पिक विमा देण्यात येत असून शेतकऱ्यांच्या हिस्स्याची सुमारे 3312 कोटी इतकी रक्कम राज्य शासन भरणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषापेक्षा जास्त रक्कम देण्यात आला आहे. जून ते ऑक्टोंबर 2022 या कालावधीतील नुकसानीपोटी 62 लाख 60 हजार शेतकऱ्यांना सुमारे 7093.19 कोटी निधी वाटप करण्यात आला आहे. तसेच प्रामाणिकपणे कर्जाचा हप्ता फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 50 हजार रुपये प्रमाणे सुमारे 4 हजार 683 कोटींची रक्कम 12.84 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील 17441 शेतकऱ्यांना 185.99 लाख इतक्या रकमेचे अनुदान रक्कम त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेच्या टप्पा क्र. 2 मध्ये पाच हजार गावे घेण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे शासन शेतकरी, सर्वसामान्यांच्या हितासाठीच निर्णय घेत असून राज्यातील सर्व जनतेच्या आरोग्यासाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा आता 1 लाखावरून 5 लाख इतकी करण्यात आली आहे. राज्यात 700 आपला दवाखाने सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच गरिबांचा सण आनंदात जावा यासाठी आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे राज्यातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे, असल्याची माहिती त्यांनी दिली.
शासन आपल्या दारी या उपक्रमाला राज्यात भरघोस प्रतिसाद मिळाला. याअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 3 लाख जणांना विविध सेवा देण्यात आल्या आहेत.
यापूर्वीच्या काळात थांबलेली गुंतवणूक या शासनाच्या काळात पुन्हा सुरू झाली आहे. गेल्या एक वर्षात सुमारे 18 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून परदेशी गुंतवणुकीमध्ये राज्य देशात अव्वल स्थानावर आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.