कॅशलेस व्यवहाराकडे वाटचाल करताना मुद्रा शास्त्रीय ठेवा जतन करणे आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 10 : वेगवेगळ्या राजवटीत जारी केलेले चलनी शिक्के त्या-त्या काळातील घटनांवर व इतिहासावर प्रकाश टाकतात. भारताचा मुद्रा शास्त्रीय ठेवा देशाइतकाच प्राचीन आहे. आज देश कॅशलेस व्यवहारांकडे वाटचाल करताना देशाचा मुद्रा शास्त्रीय ठेवा जतन करणे आवश्यक आहे. इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने प्राचीन नाण्यांचे दस्तऐवजीकरण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते नाणे शास्त्रज्ञ व संग्राहक डॉ. दिलीप राजगोर यांनी लिहिलेल्या ‘कॉइन्स ऑफ मुंबई मिंट : १९४७ ते २०२३’ व ‘कॉइन्स ऑफ नोएडा मिंट : १९८८ ते २०२३’ या दोन पुस्तकांचे सोमवारी (दि. १०) राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

भारतात ५५० पेक्षा अधिक संस्थाने होती व अनेकांची आपापली नाणी होती. छत्रपती शिवाजी महाराजांची टाकसाळ होती, तसेच मुघल, पोर्तुगाल, डच, फ्रेंच व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी शासकांची देखील आपापली नाणी होती, असे राज्यपालांनी सांगितले. आपल्या वैयक्तिक संग्रहामध्ये व्हिक्टोरिया राणी, राजे पंचम जॉर्ज व षष्ठम जॉर्ज यांचे चित्र असलेली नाणी असून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण वापरतो, अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली.

डॉ. राजगोर हे नाणेशास्त्र या विषयावर लिखाण, ब्लॉग व यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रबोधन करीत असतात. त्यांच्या मुंबई व नोएडा टांकसाळीत नाण्यांच्या पुस्तकामधून अनेक दुर्मिळ नाण्यांची माहिती मिळते, असे नाणे संग्राहक डॉ. प्रकाश कोठारी यांनी यावेळी सांगितले.

प्रकाशन सोहळ्याला लेखक डॉ. राजगोर, अशोकसिंग ठाकूर आणि डॉ. राजगोर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

**

Maharashtra Governor release books on Coins of Mumbai & NOIDA Mints

Maharashtra Governor Ramesh Bais released the books ‘Coins of Mumbai Mint: 1947 – 2023’ and ‘Coins of NOIDA Mint : 1988 – 2023’ at Raj Bhavan, Mumbai on Mon (10 July).  The books have been authored by Numismatist and Coin Collector Dr Dilip Rajgor

Speaking on the occasion, the Governor said coins of various rulers reflect the events and history of the era in which they were minted.  He expressed the need to document all the old coins urgently, especially since the world is moving towards a cashless economy.

Coin Collector Dr Prakash Kothari, Ashok Singh Thakur and family members of Dr. Rajgor were present.

**