सातारा दि.२४ : टोळेवाडी ता.पाटण येथील ग्रामस्थांसमवेत पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे यांनी भर पावसात डोंगरकडाची पाहणी करत असताना अचानक पाऊस वाढल्याने मोबाईल फोन बंद झाला. त्यामुळे नव्यानेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सॅटेलाईट फोनचा वापर केला.
संबंधित गावाचे ग्रामस्थ यांनी देखील सदर फोनवरून संबंधित अधिकारी यांचेशी चर्चा करून माहिती दिली. नैसर्गिक आपत्ती दरम्यान सॅटेलाईटच्या फोनचा ग्रामस्थांनी सक्षमपणे वापर केल्याने समाधान व्यक्त होत आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून सदर गावातील नागरिकांना गावाजवळच्या मंदिरात किंवा लगतच्या सुरक्षित ठिकाणी किंवा पाटण मधील शाळेत थांबण्याबाबत उपविभागीय अधिकारी श्री. गाडे यांनी सूचना दिल्या. त्याप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित होण्याचे त्यांनी मान्य केले आहे.
यापूर्वी त्या डोंगरकडाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागमार्फत प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आलेली आहे. मात्र पाऊस सुरू असल्याने या कड्याची तांत्रिकदृष्ट्या पाहणी करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या संबंधित विभागाला उपविभागीय अधिकारी यांनी सूचना दिल्या
000