माणच्या दुष्काळी भागात फुलतेय सफरचंदाची बाग

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आर्थिक स्थैर्य तर प्राप्त करू शकतोच, पण, त्याचबरोबर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग यशस्वी करून इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. असेच एक चांगले उदाहरण उभे केले आहे माण तालुक्यातील टाकेवाडीचे प्रगतशील शेतकरी जालंदर जगन्नाथ दडस यांनी.

सातारा जिल्ह्यातील माण हा दुष्काळी प्रदेश म्हणूनच ओळखला जातो. पाणी फौन्डेशनच्या माध्यमातून येथे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आले आहे. तसेच सिंचनाच्या अनेक योजना राबवून या भागात आता पाणी आले आहे. तरीही नैसर्गिक पाऊस हा कमीच असल्याने पाण्याची उपलब्धताही मर्यादीतच आहे. या सर्वावर मात करत जालंदर दडस यांनी माण सारख्या दुष्काळी भागात बाग फुलवली आहे आणि तीही चक्क सफरचंदाची. ऐकूण आश्चर्य वाटले ना. पण, हे खरं आहे. सिमला, काश्मिर सारख्या थंड हवेतील पीक अशी ओळख असलेले सफरचंद आता माण तालुक्यातील डोंगर रांगावरही घेता येते हे श्री. दडस यांनी दाखवून दिले आहे.

टाकेवाडीचे जालंदर जगन्नाथ दडस यांनी 10 वी नंतर सातारा येथून आयटीआय केले. त्यानंतर पुणे येथे एनसीपीसी केले. सुरुवातीला बजाज ॲटो पुणे येथे इलेक्ट्रिशियन म्हणून काम केले. पण, तिथे त्यांचे मन फारसे रमले नाही. म्हणून ते आपल्या गावी परत आले आणि शेतीकडे त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांच्या या ध्येयाला जिल्हा परिषद व कृषि विभाग यांचीही चांगली साथ मिळाली.

शेतीत प्रयोग करायचे तर अनेक सुविधा उभे करणे ही गरज असते. या सुविधा उभारण्यासाठी त्यांनी शासनाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये त्यांना ठिबक सिंचनासाठी 1 लाख रुपयांचे अनुदान मिळाले. त्यासोबतच विहीरीसाठी दीड लाख, 10 गुंठ्यात उभारण्यात आलेल्या शेडनेट साठी दीड लाख, पॅकिंगहाऊससाठी दीड लाख तर गांडूळ खत प्रकल्पासाठी 20 हजार आणि नॅरेफसाठी 20 हजार रुपये असे अनुदान त्यांना मिळाले. या शासनाच्या विविध योजना एकत्रित करून त्यांनी शेतीमध्ये फळबाग लागवड केली.

सुरुवातीस डाळिंब, सिताफळ यांची बाग केली. त्याचबरोबर भाजीपालाही घेत असत. सांगली येथील वन विभागाच्या प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी त्यांच्या शेतामध्ये भेट देण्यासाठी आले असता त्यांनी या भागामध्ये सफरचंदाची शेती होऊ शकते असे सांगितले. त्यांच्या या सूचनेनुसार श्री. दडस यांनी धोका पत्करण्याचे ठरवले. धोका अशासाठी की एक तर सफरचंद हे थंड हवेतील फळ, त्यात माण तालुक्यातील हवा ही उष्ण आणि कोरडी. त्यामुळे हा एक प्रकारचा धोका पत्करणेच होते. पण, त्यांनी मनावर घेतले आणि सुरुवातील 8 गुंठे क्षेत्रावर त्यांनी सफरचंदाची सिडलिंग राफ्टिंगद्वारे लागवड केली.

तिसऱ्या वर्षी सफरचंदाचे उत्पादन निघाले. 8 गुंठ्यामध्ये त्यांना 400 ते 500 किलो फळ मिळाले. सरासरी 130 रुपये किलो दराने त्याची विक्री करण्यात आली. त्यातून त्यांना सुमारे साडे पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळाले. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी 30 गुंठ्यात सफरचंदाची बाग तयार केली. त्यामध्ये अण्णा, हरमन, डोरस्ट गोल्डन या जातीच्या सफरचंदाची लागवड केली. त्यामध्ये 13 गुंठ्यांमध्ये एम-9. एम-7, एम – 111 या जातींची हॉलंड आणि इटलीमधून मागवलेली रोपे लावली आहेत. तसेच 5 ते 6 गुंठ्यात त्यांनी नर्सरीही सुरु केली आहे.

मे ते जून मध्ये फळ काढणीसाठी येतात. यंदाच्या वर्षी या बागेतील सर्वच्या सर्व 800 झाडांना फळधारणा होणार असल्याचे श्री. दडस यांनी सांगितले. तिसऱ्या वर्षी एका झाडाला 15 किलो फळ येते. तर चौथ्या व पाचव्या वर्षापासून किमान 40 ते 50 किलो फळ एका झाडापासून मिळते असेही श्री. दडस यांनी सांगितले. तसेच जमीन गाळाची व निचऱ्याची असावी लागते. त्यामुळे फळ धारणा चांगली होते. सध्या त्यांच्या शेतामध्ये सिंगल लिडर पद्धतीने वाढलेली झाडे आहेत. त्यामुळे  उत्पादन चांगले मिळतेच शिवाय झाडाचे आयुष्यही वाढत असल्याचे ते म्हणाले. पुढील वर्षाच्या हंगामामध्ये किमान 35 ते 36 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या शिवाय शेतामध्ये डांळिंबाची दीड एकरात 850, सिताफळाची दीड एकरात 700 झाडांबरोबरच आंबा, नारळ, अंजिर, जांभूळ, रामफळ अशी फळझाडे लावली आहेत.  संपूर्ण शेती ही सेंद्रीय पद्धतीने करत असल्याचेही श्री. दडस यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकल्पामध्ये शासकीय योजनांची व शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाची सर्वात मोठी मदत झाल्याचे श्री. दडस आवर्जून सांगतात. ज्या ज्या वेळी अडचण आली त्या त्या वेळी कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी योग्य मार्गदर्शन केल्याचे सांगून शासन राबवत असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळाल्यामुळे शेतीमध्ये विविध प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना  त्यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे श्री. दडस यांना जिल्हा परिषदेचा सेंद्रीय शेतीसाठीचा डॉ.जे.के.बसू सेंद्रिय व अधुनिक शेती पुरस्कार 2022-23 देऊन सन्मानित करण्यात आले आहे. माण सारख्या दुष्काळी भागात विविध शासकीय योनजा राबवून शेतीमध्ये चांगले प्रयोग करून जालंदर दडस यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ हा मंत्र दिला असल्याचे दिसून येते.

हेमंतकुमार चव्हाण

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, सातारा