सोलापूर, दि. 25( जिमाका):- श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकासासाठी 173 कोटी 26 लाख 67 हजार 526 रुपयांचा आराखडा प्रशासनाने तयार केलेला आहे. या आराखड्याला जिल्हास्तरीय समितीची मान्यता असून हा आराखडा 27 जुलै 2023 रोजी शासनाला सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
श्रीक्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने मुंबई येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. त्यांच्यासमवेत आमदार सुभाष देशमुख उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जे. कोंडेकर, श्री. वाडकर, नगर रचना सहायक कल्याण जाधव, भूसंपादन अधिकारी अभिजीत पाटील, मंद्रूप तहसीलदार राजशेखर लिंबारे, लोकमंगल बँकेचे संचालक प्रल्हाद कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे पाटील पुढे म्हणाले की श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी आवश्यक असलेली जमीन भूसंपादित करण्यासाठी कार्यवाही करावी. या विकास आराखड्यात किती जमीन आवश्यक आहे, तसेच त्यासाठी किती शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित करावी लागेल व त्यासाठी द्यावा लागणारा मावेजा याबाबतचाही निधी आराखड्यात प्रस्तावित करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
173 कोटीचा तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा सादर करत असताना यामुळे या भागात किती रोजगार निर्मिती होईल त्याचेही सर्वेक्षण करावे. स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणे आवश्यक आहे. तसेच शासनाला प्रस्ताव सादर करत असताना प्रत्येक विभागाला किती निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे त्याचाही स्वतंत्रपणे उल्लेख करावा व संपूर्ण प्रस्ताव एकत्रित करून त्वरित शासनाला सादर करावा, असे निर्देश श्री. विखे पाटील यांनी दिले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल विकास आराखड्याची माहिती दिली. कुडल संगम हे सोलापूर शहरा जवळील प्रमुख ऐतिहासिक महत्त्व असलेले एक अतिशय लोकप्रिय तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी भीमा आणि सीना या दोन नद्यांचे संगम होतो. जिल्ह्यातील अनेक सुंदर प्राचीन मंदिरापैकी कूडल येथील श्री संगमेश्वर आणि श्री हरीहरेश्वर मंदिर पाहण्याजोगे असून हे ठिकाण राज्यातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक असल्याचे त्यांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी पूर्वीची 6 एकर जमीन असून नवीन 7.14 एकर जमीन भूसंपादित करावी लागणार आहे. शेजारील आठ शेतकऱ्यांची ही जमीन असून यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देय राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सर्व कामांची माहिती देऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, राज्य वीज वितरण कंपनी, भूसंपादन, महसूल, पोलीस, पुनर्वसन या विभागाच्या कामाची माहिती देऊन जल पर्यटन, लाईट अँड साऊंड शो, उद्यान विकास, वृक्ष लागवड, चिल्ड्रन पार्क या सर्व कामांची माहितीही त्यांनी दिली. या सर्व कामासाठी 173 कोटी 22 लाख 67 हजार 526 रुपये इतक्या निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुरीसाठी पाठपुरावा
श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल संगम तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख हे सातत्याने प्रयत्न करत होते, त्यांच्या प्रयत्नातूनच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विकास आराखड्याला मान्यता देणाऱ्या जिल्हास्तरीय समितीची बैठक दिनांक 24 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीत प्रशासनाने सादर केलेल्या 173 कोटीच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडल हत्तरसंग गावात श्री संगमेश्वर व श्री हरी हरेश्वर हे दोन्ही मंदिरे भीमा आणि सीना नदीच्या संगम काठावर आहेत. या ठिकाणी दररोज हजारो नागरिक भेट देत असतात हे धार्मिक पर्यटनाचे जिल्ह्यातील मुख्य केंद्र बनू शकते. यापूर्वी या तीर्थक्षेत्र विकासासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अनेक बैठका घेण्यात आलेल्या आहेत. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील आजच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकासाच्या आराखड्याला समितीची मान्यता मिळण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी श्री क्षेत्र हत्तरसंग व कुडल येथे भेट देऊन पाहणी केलेली होती.
या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये इमारती बांधकामासाठी 70 कोटी 24 लाख, पायाभूत सुविधा कामांसाठी 18 कोटी 80 लाख, सोयी सुविधा साठी साडेआठ कोटी, करमणूक व मनोरंजन कामासाठी वीस कोटी सत्तर लाख, जीर्णोद्वार व संवर्धनासाठी 45 कोटी 61 लाख, सुरक्षा व्यवस्था साठी चार कोटी 26 लाख व भूसंपादनासाठी पाच कोटी सात लाख असे एकूण 173 कोटी 22 लाखाच्या निधी आवश्यक आहे.
तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास प्रकल्पामुळे होणारे फायदे
प्रकल्पामध्ये प्रस्तावित विविध आवश्यक इमारती जसे की, सभामंडप, बहुउद्देशीय सभागृह, भक्त निवास, ध्यानकेंद्र, कुस्ती केंद्र, गोशाळा, भव्य पार्किंग, प्रसाधनगृह, संग्रहालय, वाचनालय, वाणिज्य संकुल, हॉटेल-दुकाने तसेच अंतर्गत रस्ते, प्रवेशद्वार, सावर्जनिक पथदिवे, संरक्षण भिंत, घाटक्षेत्र, विविध प्रकारचे बाग-बगीचे, लहान मुलांचे खेळाचे क्षेत्र व इ. सोयीसुविधामुळे श्री. हरीहरेश्वर मंदिर, श्री. संगमेश्वर मंदिर व संगम पहावयास येणारे भाविकांना त्यांची यात्रा सुखकर व सोयीचे होईल.
श्री. महात्मा बसवेश्वर स्मारक, संग्रहालय, वाचनालय, भक्तनिवास यामुळे श्री. महात्मा बसवेश्वर यांचे अनुयायी यांना श्री. महात्मा बसवेश्वर यांची वचने
व विचार प्रसार होण्यास मदत होईल. कृषी पर्यटनामुळे येणाऱ्या भाविकांना याबाबत प्रचार व प्रसार होऊन स्थानिक पदार्थांचा वाजवी दरात आस्वाद घेता येईल. प्रस्तावित तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास प्रकल्पामुळे सभोवतालच्या भागाचा आर्थिक विकास होऊन स्थानिक अर्थकारणाला चालना मिळेल. तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास प्रकल्पामुळे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास प्रकल्पातील नौकाविहारामुळे जलमार्गाद्वारे दक्षिण सोलापूर तालुका ते अक्कलकोट व कर्नाटकातील नागरिकांना अधिकच्या दळणवळणाची व्यवस्था उपलब्ध होणार आहे व त्यामुळे प्रवासाचे अंतर कमी होऊन नागरिकांचे वेळ वाचेल. प्रकल्पामध्ये पर्यावरण पूरक वृक्षारोपण व हरित पट्टा विकास, जलपुनर्भरण, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, शुद्ध पाणी प्रक्रिया केंद्र , सौरऊर्जेवरील प्रकल्प इ. पर्यटन स्थळाची पर्यावरण निर्देशांक वाढण्यास मद्दत होईल.
संगम तीर्थक्षेत्राच्या विकासामुळे जसे की, घाट सुशोभीकरण, संरक्षण भिंत इतर सांस्कृतिक पूजा व इतर विधी करण्याकरिता सुविधा, प्रसाधन गृहांची व्यवस्था, संगीत कारंजे, थीमॅटिक मल्टीमीडिया शो मार्फत सदरील जागेचे महत्व व श्री. महात्मा बसवेश्वरांचे जीवनचरित्र स्थानिकांना व पर्यटकांना विविध भाषेत व कलेने सादरीकरण केल्यामुळे श्री. महात्मा बसवेश्वर यांची वचने व विचार प्रसार होण्यास मदत होईल.
या ठिकाणातून व जिह्यातील इतर भागातून पुरातत्व विभागामार्फत उत्खननातून प्राप्त झालेल्या मंदिराच्या अवशेषांचे व मृत्यांचे जतन, संवर्धन व प्रदर्शन संग्रहालयामार्फत करण्यात येणार असल्याने सदरील जागेला अधिक महत्व प्राप्त होण्यास मदत होईल. तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास प्रकल्पामुळे धार्मिक व सांस्कृतिक सुसंवाद प्रस्थापित होऊन हे स्थळ एक दिवसीय पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येण्यास मदत मिळणार आहे.
0000000