पुणे, दि. २८ :- महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती मिळावी आणि त्यांना योग्य लाभ घेता यावा तसेच शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा या उद्देशाने आयोजित केलेल्या महसूल सप्ताहात नागरिकांना सहभागी करुन घ्यावे आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन सप्ताह यशस्वी करावा असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले.
राज्य शासनाच्यावतीने १ ऑगस्टपासून राज्यात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा विभागीय आयुक्तालयातून पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून आढावा घेताना ते बोलत होते. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, उपायुक्त सामान्य प्रशासन वर्षा लड्डा ऊंटवाल, उपायुक्त महसूल रामचंद्र शिंदे व अन्य विभागीय प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
विविध कार्यक्रमाचे आयोजन
१ ते ७ ऑगस्ट,२०२३ या कालावधीत सातही दिवसांत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे शासनाने निर्देशित केले आहे. या कालावधीत मसहूल दिन साजरा करण्यासह महसूल सप्ताह शुभारंभ, युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसूल संवर्गातील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा संवाद तसेच महसूल सप्ताह सांगता समारंभ इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करुन यामध्ये नागरिकांना मोठया प्रमाणावर सहभागी करुन घ्यावे, यासाठी विशेष कार्यक्रमांचे कल्पकतेने आयोजन करावे असे श्री.राव यांनी सांगितले. शासनाच्या सर्वच उपक्रमांमध्ये पुणे विभाग नेहमीच अग्रेसर राहिला असून, महसूल सप्ताह आयोजनातही विभागाने आपला नावलौकिक टिकवावा. यासाठी विभागातील सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच महसूल कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा आणि उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन श्री.राव यांनी केले.
प्रसिध्दी माध्यमांचे सहकार्य घ्यावे
माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने शासनाच्या विविध योजनांची, ध्येय धोरणांची सकारात्मक प्रसिध्दी करण्यात येते. महसूल सप्ताहाच्या ठळक आणि प्रभावी प्रसिध्दीसाठी जिल्हा माहिती अधिकारी आणि प्रसिध्दी माध्यमांचे सहकार्य घ्यावे, सप्ताहात आयोजित कार्यक्रमांची माहिती नागरिकांनी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदा घ्यावी. सर्व तालुका, उपविभागीय आणि जिल्हयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती फ्लेक्स बॅनर्सद्वारे ठळकपणे प्रदर्शित करावी अशी सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली.
000