नागपूर देशातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून विकसित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

येत्या दोन वर्षात खड्डे मुक्त शहर बनविणार; ऑनलाईन सुविधांमुळे सात दिवसात लिज पट्टा

नागपूर दि. 29 :  नागपूर शहरातील सर्व रस्ते येत्या दोन वर्षात सिमेंट काँक्रीटचे करण्यात येऊन हे शहर खड्डेमुक्त व देशातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून विकसीत करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

        जयताळा येथे नागपूर महानगरपालिका, नासुप्र आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या विविध विकासकामांचे डिजिटल लोकार्पण व भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक  मंत्री  नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी श्री.फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सर्वश्री प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मोहन मते, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, विश्वस्त संदीप इटकेलवाऱ,  बंटी कुकडे नाना श्यामकुळे, किशोर वानखेडे आदी उपस्थित होते.

        शहरातील विविध विकास कामांसाठी अर्थसंकल्पात 8 हजार कोटी निधीची तरतूद करण्यात आली. क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तयार करण्यासाठी 100 कोटी मंजूर केले आहेत, यासोबत नागपूरच्या विविध भागात खेळासाठी 50 ते 60 स्टेडीअम उभारण्याकरिता 100 कोटी निधी मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि नागपूरात एक हजार एकरावर होत असलेल्या पुरवठा साखळी हब मुळे नागपूर हे लवकरच देशाचे लॉजिस्टीक कॅपीटल म्हणून उदयास येईल असे ते म्हणाले.

        नागपूर शहरातील पट्टे वाटपाचे धोरण राबवितांना एकात्मता नगर व रमाबाई आंबेडकर नगर या दोन वस्तींमध्ये जागा झुडपी जंगल श्रेणीत येत असल्याने मालकी हक्क नाकारण्यात आले होते. याबाबत सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात आली असून झुडपी जंगलाची जागा महसूली जागा म्हणून गणल्या जावून नागरिकांना लवकरच मालकी हक्काचे पट्टे मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

        केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘शहरात मेट्रो,  मिहान,  एम्स,  सिम्बॉयसिस, मेयो-मेडिकलचा विकास यासारखी विविध विकासकामे जनतेच्या सहकार्याने करण्यात आली असल्याचे सांगितले. लवकरच संपूर्ण नागपूरात चोवीस तास पाण्याची सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. गरिबांना कायदेशीर मार्गाने स्वस्तात घरे दिल्यास अनधिकृत वस्त्या निर्माण होणार नाहीत, यासाठी राज्य शासनाने योजना आखण्याची मागणीही त्यांनी केली. विकास कामामुळे  नागपूरची आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख निर्माण होईल असे त्यांनी सांगितले.

        मंत्रीद्वयांच्या हस्ते महानगरपालिकेच्या जयताळा येथील नवीन जल कुंभाचे तसेच वर्धा रोड ते जयताळा बाजार पर्यंतच्या सिमेंट रोड चे लोकार्पण आणि  पर्यावरण पूरक दफनभूमी विकास कामाचे भूमिपूजनाचे डिजिटल लोकार्पण करण्यात आले. तसेच  नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या अखत्यारितील दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील सिमेंट रस्ते, पर्जन्य वाहिनी,  मलवाहिका,  इंटलॉकिंग ब्लॉक,  जयताळा येथील विविध रस्त्यांचे डांबरीकरण या कामांचे भूमीपूजन आणि ऑनलाईन गुंठेवारी, ऑनलाईन भाग नकाशा, सात दिवसांत लिज पट्टा संगणकीय प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.

        आमदार प्रविण दटके यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. महानगरपालिका आायुक्त सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाची माहिती दिली तर मनिष सोनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाला महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यासचे पदाधिकारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

000