बोधीवृक्ष स्थापना महोत्सवाच्या दृष्टीने सुत्रबद्ध नियोजन करण्यात यावे : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा : नाशिक शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्धस्माकराच्या परिसरात येत्या ऑक्टोबर महिन्यात  श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या बोधीवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देशभरातून उपासक येणार असल्याने त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधांचे सुत्रबद्ध नियोजन करण्यात यावे. अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ  यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

आज मंत्री छगन भुजबळ यांनी त्रिरश्मी बुद्ध लेणी बोधीवृक्ष स्थापनेचे नियोजित स्थळ व सभा ठिकाण यांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त अकुंश शिंदे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता एस. आर. वंजारी, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदन्त सुगत, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, येत्या नोव्हेंबर महिन्यात देशव्यापी बोधीवृक्ष स्थापना महोत्सव नाशिक शहरात या ठिकाणी महिनाभर होणार आहे. या महोत्सवास श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जापान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने बुद्धस्मारक परिसरात वाहन व्यवस्था, येणाऱ्या बौद्ध उपासकांची निवास, भोजन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था व इतर सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात यावे. तसेच सभेचे नियोजित स्थळी खड्डेभरणी, सपाटीकरण व इतर तांत्रिक अनुषंगिक बाबींची पूर्तता करण्याबाबतच्या सूचना मंत्री श्री.भुजबळ यांनी उपस्थित अधिकारी व अभियंता यांना दिल्या.

बोधीवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व असून इ.स.पूर्व 2566 वर्षांपूवी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना निरंजना नदीच्या काठावार बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे हे बोधीवृक्ष अतिपूजनीय आहे. पुढे सम्राट अशोक यांच्या मुलांनी या बोधीवृक्षाची फांदी श्रीलंकेच्या देवानामप्रिय तिरस यांच्या हस्ते अनुराधापूर येथे स्थापित केली. याच बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण नाशिक शहरात करण्यात येणार असल्याने शहराच्या ऐतिहासिक महत्वात भर पडणार असल्याची माहिती शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदन्त सुगत यांनी यावेळी दिली.

00000