आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी कायदा करण्याबाबत छाननी प्रक्रिया सुरु – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 2 : कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी विशेष कायदा करण्याबाबत धर्मादाय आयुक्तांकडून काही मुद्यांबाबत माहिती मागविली असून त्या अनुषंगाने छाननी प्रक्रिया सुरु असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.
कोल्हापूर येथील श्री. महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर संदर्भात शासनाकडून विशेष कायदा करण्यात आलेला आहे. या कायद्याप्रमाणे श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी कायदा करण्यात यावा याबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
श्री. फडणवीस म्हणाले की, श्री संत बाळूमामा यांचे महाराष्ट्र व कर्नाटकात भाविक आहेत. या भाविकांसाठी सोयीसुविधा पुरविण्यात येतील. श्री. संत बाळूमामा देवस्थानच्या न्यासात सदस्य म्हणून त्यांच्या कुटुंबातील सदस्य व राज्यभरातील भक्तगणाच्या समुदायातील प्रतिनिधीत्वाबाबत योग्य तो विचार केला जाईल.
श्री संत बाळूमामा देवस्थानबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दफ्तर हस्तांतर करण्याची सूचना देण्यात येऊन आवश्यकता असेल तर धर्मादाय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच देवस्थानबाबत वेगळा कायदा करण्यासंदर्भात धर्मादाय आयुक्तांचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. गैरकारभाराबाबतची माहिती मागविली आहे, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री महादेव जानकर, प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.
००००
दत्तात्रय कोकरे/विसंअ/
हिमोफिलियावरील उपचारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सुरू करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत
मुंबई, दि. 2 : हिमोफिलिया हा अनुवंशिक रक्तदोषामुळे होणारा आजार आहे. या आजाराच्या रुग्णांचा तपास, निदान व उपचारासाठी राज्यात नऊ ठिकाणी केंद्र असून येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात हे केंद्र सुरू करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य उमा खापरे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.
प्रा.डॉ.सावंत म्हणाले की, या रूग्णांमध्ये रक्त गोठण्याच्या फॅक्टर आठ आणि नऊ ची कमतरता असते. त्यामुळे अतिरक्तस्त्राव होतो. स्त्रिया या हिमोफिलिया आजाराच्या वाहक असतात तर पुरूषांना याची लक्षणे दिसून येतात. अशा रूग्णांना शिरेद्वारे फॅक्टर देण्यात येतात. राज्यात सध्या जिल्हा रूग्णालय ठाणे, नाशिक, सातारा, अमरावती, औरंगाबाद, अहमदनगर आणि डागा स्त्री रूग्णालय नागपूर, केईएम रूग्णालय मुंबई आणि बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे या आजारावर मोफत उपचारासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डे-केअर सेंटरमध्ये एकूण 5962 रूग्णांची नोंदणी करण्यात आलेली आहे.
सद्यस्थितीत विभागामार्फत नऊ केंद्रांना हिमोफिलिया फॅक्टरचा पुरवठा करण्यात येतो. या फॅक्टर्सच्या खरेदीसाठी केंद्र सरकारकडून सन 2022-23 मध्ये 27 कोटी इतका निधी प्राप्त झाला. तर 2023-24 मध्ये 55 कोटी रूपये इतका निधी मंजूर असून त्याची खरेदीप्रक्रिया राज्यस्तरावर सुरू आहे. येत्या काळात सर्व जिल्ह्यांत डे-केअर केंद्र सुरू करून औषधपुरवठा करण्यात येणार असल्याचे मंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी सांगितले.
या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य महादेव जानकर, डॉ.मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.
००००
बी.सी.झंवर/विसंअ/
राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या कायद्यातील तरतुदींनुसारच – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई
मुंबई, दि. 2 : राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या नागरी सेवा मंडळाच्या शिफारसीनुसार सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने केलेल्या आहेत. ही प्रक्रिया कायद्यातील तरतुदींचे योग्य पालन करून पारदर्शक पद्धतीने पार पाडली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य अशोक ऊर्फ भाई जगताप यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री.देसाई म्हणाले, विभागात 254 मंजूर पदे असून त्यातील 201 पदे कार्यरत आहेत. यापैकी 61 पदे यावर्षी बदलीस पात्र होती. प्रत्यक्षात 52 पदांच्या बदल्या केलेल्या असून त्यापैकी 42 अधिकाऱ्यांच्या बदल्या पसंतीक्रमानुसार, 14 बदल्या विनंतीनुसार तर 10 बदल्या प्रशासकीय कारणास्तव केलेल्या आहेत. या बदल्यांमध्ये कोणतीही अनियमितता झालेली नाही. तथापि ठराविक अधिकाऱ्यांविषयी तक्रार असल्यास त्यांची प्रकरणे तपासून त्याबाबत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.
००००
बी.सी.झंवर/विसंअ/
भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातील भुयारी गटार प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार -मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 2 – भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व शहराच्या विकासाच्या दृष्टीने भुयारी गटार योजना राबविणे आवश्यक होते. यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत भुयारी गटार (टप्पा-2) प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असून हे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल, असे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य सुरेश धस यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री.सामंत म्हणाले की, मूळ योजनेची निविदा प्रक्रिया 2011 मध्ये सुरू करण्यात आली. तथापि भूसंपादनास विरोध झाल्याने प्रत्यक्ष योजना 2015 मध्ये सुरू झाली. सदर प्रकल्पावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून देखरेख होत असून कामाची गुणवत्ता नियमित तपासली जाते. तसेच आयआयटी मुंबई आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे या नामांकित संस्थांमार्फत त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण झालेले आहे. त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण काम झाले असल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कंत्राटदारास देयकांची रक्कम प्रदान करण्यात आलेली असल्याचे मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले. सद्यस्थितीत या योजनेचे 93 टक्के काम पूर्ण झालेले असून डिसेंबरपर्यंत उर्वरित काम पूर्ण होईल, असे ते म्हणाले. योजनेंतर्गत दुरूस्ती केलेल्या रस्त्यांवर अपघात वा जीवितहानी झाल्याची तक्रार महानगरपालिकेस प्राप्त नाही. तथापि ही माहिती चुकीची असल्यास त्याची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.
००००
बी.सी.झंवर/विसंअ/