ज्येष्ठ साहित्यिक ना. धों.महानोर यांच्या निधनाबद्दल विधानपरिषदेत शोकप्रस्ताव

मुंबई, दि.4 :- विधानपरिषदचे माजी सदस्य, ज्येष्ठ साहित्यिक ना. धों.महानोर यांच्या निधनाबद्दल विधानपरिषदेत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शोक प्रस्ताव मांडला.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, दिवंगत ना. धों. महानोर यांचा जन्म  16 सप्टेंबर 1942 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड येथे झाले. त्यांच्या कवितेचा विषय हा फक्त निसर्ग नव्हता, तर अनुभूती होती. उत्कट संवेदन क्षमतेने त्यांची कविता अखेर पर्यंत बहरलेली होती. त्यांच्या लिखाणात बोलीभाषेची सहजता दिसून येत होती. नेमकेपणा आणि सूचकपणा ही त्यांच्या साहित्याचा एक भाग होता. त्यांच्या कवितेची नाळ ही ग्रामीण भागाशी जोडलेली होती. ग्रामीण भागातील दुःख आणि कष्ट यांची संवेदना त्यांच्या कवितेत होती. रानातील कविता, पावसाळी कविता, गांधारी, गावातील गोष्टी, अजिंठा असे विपुल लेखन त्यांनी केले होते. त्यांनी गीतकार म्हणून देखील आपला ठसा उमटवला आहे. विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी कष्टकऱ्यांचे विविध प्रश्न सभागृहात मांडले होते. राज्याचे सांस्कृतिक धोरण असावे, अशी ना. धों.महानोर यांची सूचना होती, असेही  उपसभापती डॉ. गोऱ्हे  यांनी प्रस्तावात सांगितले.

०००

संध्या गरवारे/विसंअ