विधानसभा कामकाज

शासकीय रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 04 :- राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमधील शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी नागरिक येतात. या रुग्णालयांमध्ये रुग्णांना अधिकाधिक आणि अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आगामी काळात शासकीय रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य अमिन पटेल यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान मुंबईतील शासकीय रुग्णालयातील सोयी-सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील सोयी-सुविधांबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबत 15 दिवसात बैठक घेण्यात येईल. या रुग्णालयातील सोयी सुविधांवर केलेल्या खर्चाचीही उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. तसेच धर्मादाय ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांसाठी जी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी होते की नाही, हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येईल. ग्रामीण भागातून मुंबईमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची समस्या सोडवण्यासाठीही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत ॲड.आशिष शेलार, मनीषा चौधरी यांनी सहभाग घेतला.

००००

शैलजा पाटील/विसंअ

नागपूर विद्यापीठातील बनावट पदवीप्रकरणी सखोल चौकशी करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

             मुंबई, दि. 4 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बनावट पदव्या तयार करून 27 विद्यार्थ्यांनी इराकमध्ये नोकरी मिळवल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या बनावट पदव्या तयार करून 27 विद्यार्थ्यांनी इराकमध्ये नोकरी मिळवल्याबाबतचा प्रश्न सदस्य मोहन मते उपस्थित केला होता.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, इराक दूतावासामार्फत 27 विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता तपासण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार इराक दूतावासातील अधिकाऱ्यांनी विद्यापीठाला प्रत्यक्ष भेट देऊन 27 विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रमाणपत्र तपासण्याकरीता सादर केले होते. विद्यापीठात या विद्यार्थ्यांची नोंद नसल्याचे अभिलेख्याच्या तपासणीवरून आढळून आल्याने विद्यापीठात सादर करण्यात आलेली प्रमाणपत्रे विद्यापीठाची नाहीत, असे इराक दूतावासाला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

हे विद्यार्थी इराकचे असल्याने त्यांची चौकशी इराक दूतावासामार्फत करण्यात येईल, असे इराक दूतावासातील अधिकाऱ्यांनी विद्यापीठास कळविले आहे.

तसेच या प्रकरणाची माहिती विद्यापीठाकडून अंबाझरी पोलीस ठाणे, नागपूर, सचिव शिक्षा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, सचिव, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि  अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांना देण्यात आली आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

या चर्चेत सदस्य अनिल देशमुख, नितीन राऊत, विकास ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, रवींद्र वायकर, ॲड.आशिष शेलार यांनी सहभाग घेतला.

00000

काशीबाई थोरात/विसंअ