महिला बचत गटांना माविमने व्यवसायाभिमुख मार्गदर्शन करावे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 10 : राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण व शहरी महिला बचत गट आहेत. या महिला बचत गटांतील सदस्यांना व्यवसायाभिमुख मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. बचतगटातील सदस्यांना महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत अधिकाधिक मार्गदर्शन देऊन बचत गटांचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केल्या.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या आढावा बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखड, महाव्यवस्थापक कुसुमताई बाळसराफ, रविंद्र सावंत माविमचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील ९९ हजार ६९९ तर शहरी भागातील ६५ हजार ३३० बचतगटांना सातत्याने मार्गदर्शन करण्यात यावे. ग्रामीण व शहरी भागातील बचतगटांच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. ई-बिझनेस प्लॅटफॉर्ममध्ये महिलांचा सहभाग वाढवावा. शाश्वत विकासासाठी माविमने बचत गटांसाठी योजना सादर कराव्यात, अशा सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी केल्या.

तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम, अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रम, केंद्रपुरस्कृत योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती कार्यक्रम, स्वयंसहाय्यता बचत गट, माविमचे ध्येय व उद्दिष्टे, नाविन्यपूर्ण उपक्रम याची सविस्तर माहिती यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या  व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखड यांनी दिली.

***

संध्या गरवारे/विसंअ/