मुंबई, दि. १० : मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केले.
माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्था परिसरात १३ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलपती पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, कुलगुरु अनिरुध्द पंडित, संचालक उदय अन्नपुरे प्राध्यापक प्रदीप वाविया, कुलसचिव राजेंद्र देशमुख, अधिष्ठाते, विविध विभागांचे विभाग प्रमुख, आजी माजी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे आजी – माजी विद्यार्थी, संस्थेत शिकून पुढे विविध कंपन्यांचे प्रमुख झालेले माजी विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, या संस्थेने आतापर्यंत १९ पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती, कोणत्याही व्यवसायाची पार्श्वभूमी नसलेले ६०० पेक्षा अधिक उद्योजक देशाला दिले आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थांमध्ये नॅकमध्ये ४ पैकी ३.७७ असे सर्वोत्तम गुण मिळवून A++ ग्रेड, टाइम्स हायर एज्युकेशन २०२३ क्रमवारीत आशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये २५१ ते ३०० च्या दरम्यान तर केंद्र सरकारच्या एनआयआरएफ क्रमवारीत विद्यापीठांमध्ये २३ वा क्रमांक तसेच एमएचआरडीने जाहीर केलेल्या अटल (ARIIA) क्रमवारीत सहावा क्रमांक मिळविल्याबद्दल मंत्री श्री. पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाला बलशाली आणि वैभवशाली बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये तरुणांचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे. त्यासाठी तरुणांनी नवीन संशोधन, पेटंट आणि नाविन्यता यावर अधिक भर द्यावा, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
संशोधनाच्या क्षेत्रातही रसायन तंत्रज्ञान संस्था उत्तम कामगिरी करीत आहे. गेल्या १० वर्षांत ४०० पेक्षा अधिक पेटेंट्स घेतलेले आहेत. अनेक संशोधन प्रकल्पांवर काम सुरू आहे. औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन संस्थेने जालना व भुवनेश्वर येथे सेंटर सुरू केले आहे. या दोन्ही ठिकाणी नविन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
००००
काशीबाई थोरात/विसंअ