मुंबई, दि. १० : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर आणि उपनगर कार्यालयामार्फत सन २०२३- २४ या आर्थिक वर्षामध्ये ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना आणि प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या पन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी महामंडळाच्या mpbcdc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर संकेतस्थळावर योजनानिहाय उपलब्ध अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह (तीन प्रती) आपले अर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालयात स्वतः दाखल करावेत. त्रयस्थ तसेच मध्यस्थामार्फत कर्ज अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.
इच्छुक अर्जदारांचे कर्ज मागणी अर्ज ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., गृहनिर्माण भवन, तळमजला रूम नं ३५, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१ या ठिकाणी स्वीकारले जातील, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
*****
शैलजा पाटील/विसंअ/