देशाच्या प्रगतीसाठी हक्कांबरोबरच कर्तव्याचे पालन कसोशीने करुया – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

0
10

अमरावती, दि. 15 (जिमाका): स्वातंत्र्य चळचळीच्या तेजस्वी इतिहासाचे स्मरण करताना देशाच्या प्रगतीसाठी हक्कांबरोबरच कर्तव्याचे पालनही कसोशीने करण्याचा निर्धार आजच्या दिनी करुया, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केले.

अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवी राणा, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले की, स्वातंत्र्य म्हणजे केवळ मुक्ती नव्हे तर स्वातंत्र्य म्हणजे मुक्तीसह हक्क व जबाबदारी या जाणिवांचा संगम असल्याचे सांगून श्री. भुजबळ पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याबरोबरच या देशात राज्यघटनेव्दारा न्याय, समता, बंधूता, एकता व एकात्मता ही मूल्ये रुजून लोकशाही प्रस्थापित झाली आहेत. स्वातंत्र्यलढ्यासाठी योगदान देणाऱ्या शहद हुतात्मे व महापुरुषांचे व स्वातंत्र्य चळवळीच्या तेजस्वी इतिहासाचे स्मरण होणे आवश्यक आहे. यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर अनेक कार्यक्रम केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश’, ‘मिट्टी को नमन’, ‘वीरोंको वंदन’हे अभियान राबविण्यात येत आहेत. या उपक्रमानुसार गाव ते शहरांपर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, हा या अभियानाचा उद्देश आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा क्रांती दिन 9 ऑगस्टपासून सुरु झाला आहे. या अभियानांतर्गत सर्व कार्यालयात ‘पंचप्रण शपथ’कार्यक्रम घेण्यात आला. ठिकठिकाणी नागरिकांनी पंचप्रण शपथ कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

‘मेरी माटी, मेरा देश’या मोहिमेत देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांचा आणि शूर वीरांचा सन्मान करुन त्यांचे स्मरण करण्यात येत आहे. या मोहिमेत शूरवीरांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी 75 देशी वृक्ष लागवड करुन अमृतवाटिका तयार करण्यात आल्या. देशाच्या स्वातंत्र्य रक्षणासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिक व शहिदवीरांच्या नावाचे ‘शिलाफलक’ तयार करुन गावागावात लावून स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन करण्यात आले. तसेच देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियान मागील वर्षीप्रमाणे यंदाही दि. 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान राबविण्यात येत आहे. तसेच ग्रामस्तरावर स्वातंत्र्य संग्राम सेनानींच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात येत आहे. भारताचा राष्ट्रध्वज हा देशाच्या सार्वभौमत्व, अखंडता, एकात्मता व एकतेचे प्रतीक आहे. समस्त भारतीय नागरिकांचा हा अभिमान व अस्मिता आहे. त्यामुळे ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान सर्वदूर राबविण्यात येत आहे. यामुळे देशभक्ती व चैतन्यमय वातावरण निर्माण झाले असल्याचे ते यावेळी म्हणाले.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि सेवांचा लाभ सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी राज्यात ‘शासन आपल्या दारी’अभियान सुरु आहे. या अभियानामुळे आजपर्यंत राज्यातील सुमारे 35 लक्ष लाभार्थ्यांना विविध लाभ मिळाले आहे. लाभार्थ्यांनी शासनाकडे येण्याऐवजी आता शासनच जनतेच्या दारात पोहोचले आहे.

मोठमोठ्या उद्योगांना आकर्षित करुन परदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्यात अमरावतीसह देशात सात ठिकाणी पीएम मित्रा अंतर्गत मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क अमरावतीजवळ नांदगावपेठ येथे उभारला जात आहे. त्यामुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे. तसेच स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.

नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत केवळ शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण आरोग्य यंत्रणाही बळकट करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहे. मेळघाट कार्यक्षेत्रात 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन शंभर खाटामध्ये करण्यात आलेले आहे. या कार्यक्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्र धुळघाट रेल्वे टेंभुरसोंडाचे श्रेणीवर्धन 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत अचलपूर येथे 200 खाटांचे नवीन रुग्णालय बांधकामाला 63.17 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.

यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यासाठी कृषी संलग्न विविध विभाग, महाविद्यालय, विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, शाळा, निमशासकीय कार्यालय, विविध स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करुन जनजागृती करण्यात येत आहे.

सन 2022-23 मध्ये महाडीबीटी प्रणालीव्दारे कृषी विभागाच्या विविध योजनांमधील घटकांसाठी 33 कोटी 57 लक्ष रुपये 13 हजार 15 लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. यामध्ये 1 हजार 400 ट्रॅक्टर्सला अनुदान देण्यात आले आहे. जिल्ह्यात जवळपास 6 हजार 660 सुक्ष्म व लघू उपक्रम सुरु असून त्यात 1 हजार 582 कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे व त्याव्दारे 41 हजार 793 लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्ह्यासाठी प्राप्त इष्टांकाची पूर्तता करण्यात आली असून पात्र शिधापत्रिकाधारकांना अन्न सुरक्षेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील डिजिटायझेशन, स्कॅनिंगचे काम पूर्ण झाले आहे.

जिल्हा पातळ्यांवर नवनव्या उद्योग व्यवसायांना चालना देत असतांनाच पायाभूत सुविधांमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गासारखा विशाल पायाभूत सुविधेचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. प्रगतीचा आलेख असा उंचावत असताना ती सर्व समावेशक असावी, यासाठी सामाजिक न्यायाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

एकनाथराव माधवसा हिरुळकर, मुलायमचंद गणपतलाल जैन, मारोतीराव रघुजी इंगळे या स्वातंत्र्य संग्राम सेनानीचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. तंबाखूमुक्तीची शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात निर्माण करण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिक गुलाबवाटिकेचे मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रपती पोलीस पदकाने विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. नाईकनवरे यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के. वानखडे, तहसीलदार संतोष काकडे, कारागृह शिपाई शरद झिंगडे, अरविंद चव्हाण, सुधाकर मालवे, होमगार्ड राजेंद्र शाहाकार यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्य शासकीय समारंभ स्थळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रारंभी पोलीस वाद्य वृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन गजानन देशमुख यांनी केले.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here