स्वातंत्र्य दिनांचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

????????????????????????????????????

धुळे : दिनांक १५ ऑगस्ट (जिमाका वृत्त); जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासोबत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाने एक वर्षांच्या कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

ते आज भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, महापौर प्रतिभाताई चौधरी, आमदार मंजुळाताई गावित, स्थायी समिती सभापती भारती भामरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, उपवनसंरक्षक नितीन सिंग, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, सहायक पोलीस अधिक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, अरविंद अंतुर्लीकर, महेश जमदाडे, सुरेखा चव्हाण,  जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर प्रदीप कर्पे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. भुसे म्हणाले की, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहे. यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य संरक्षणात प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लक्ष एवढी वाढ केली असून राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना पाच लाखापर्यंतचा उपचाराचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान ’ योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आता दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. ‘सर्वांसाठी घरे-2024’ हे राज्य शासनाचे धोरण असून, त्यानुसार बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील पात्र कुटूंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी ‘मोदी आवास घरकुल योजना’ राबविण्यात येत आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य मृत्यू, अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी झाल्यास द्यावयाच्या अर्थसहाय्यात नुकतीच वाढ करण्यात  आली आहे. शेतकऱ्यांना शेतीपंपांना दिवसा अखंडीत व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये धरणातील गाळ नेण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजना, कृषि क्षेत्रातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान 2.0, राज्यातील 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास तसेच महिलांना एसटीच्या प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत, अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने आर्थिक मदत, शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमधील आपआपसातील वाद मिटविण्यासाठी सलोखा योजना, अनुसूचित जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षिस योजना असे अनेक  हिताचे निर्णय राज्य शासनाने घेतले आहे.

मंत्री भुसे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, शेतकरी सुखी आणि समाधानी रहावा यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 12 हजार 923 शेतकऱ्यांना 53 कोटी 70 लाख रूपयांचा लाभ देण्यात आला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 2 लाख 34 हजार 152 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून 2 लाख 21 हजार 143 हेक्टर क्षेत्रास विमा संरक्षण प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 50 हजार 718 शेतकऱ्यांना 46 कोटी 92 लाख 64 हजार रक्कम वितरीत करण्यात आली आहे.  जिल्ह्यात ई-हक्क प्रणाली सुरु करण्यात आली आहे. महसुल सप्ताहानिमित्ताने नागरिकांसाठी विशेष मोहिम, विविध उपक्रम व शिबीराच्या माध्यमातून महसुल विभागमार्फत 10 हजार 707 नागरिकांना विविध लाभ देण्यात आले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत जानेवारी 2023 पासून 54 हजार 199 टन धान्यांचे मोफत वितरण करण्यात आले आहे. ‘शासन आपल्या दारी’ या अभियानात धुळे जिल्ह्यात 3 लाख 21 हजार 179 लाभार्थ्यांना 68 कोटी रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत धुळे शहरात 16 आरोग्य केंद्र स्थापन केले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा आज पासून नि:शुल्क उपलब्ध होणार आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 56 हजार 904 घरकूल पूर्ण झाले आहे. शबरी आवास योजनेंतर्गत 3 हजार 423 तर रमाई आवास ग्रामीण योजनेतंर्गत 2 हजार 993 घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातंर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत आपल्या धुळे जिल्ह्यातील साक्री- सटाणा- देवळा- चांदवड- मनमाड- येवला- कोपरगाव- शिर्डी या महामार्गावरील 42.576 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 277.82 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पातंर्गत 36 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत कामे 31 जानेवारी, 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे.

जिल्ह्यात हर घर जल संकल्पेतून आतापर्यंत 2.92 लक्ष घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. जल जीवन मिशन येाजनेअंतर्गत 560 योजनांसाठी 587 कोटी  रुपये उपलब्ध होणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2023-2024 यावर्षांसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एकूण 455 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदाराच्या घरी भेटी देऊन मतदार यादीची पडताळणी करणार आहेत. यानिमित्त मतदारांनी घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करावे.

यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 75 टक्के पाऊस झाला असून पावसाचा आणखी दीड महिना कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत चांगला पाऊस झाल्यास जिल्ह्यातील लहान-मोठे प्रकल्प भरल्यास पाणी टंचाई दूर होईल. यंदाच्या खरीप हंगामात 3 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाला आहे. प्रत्येक नागरिकाने पाण्याचे महत्व ओळखुन पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन त्यांनी जिल्हावासीयांना केले.

 महाराष्ट्र गीताने दुमदुमला परिसर

आजच्या वर्धापन दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे आशयपूर्ण, स्फुर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपरांची गाथा सांगणारे कवीवर्य श्री. राजा निळकंठ बढे यांची रचना असलेले  ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून राष्ट्रगीता सोबत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला होता.

 यांचा झाला सन्मान

भारतीय स्वातंत्र्याचा 76 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय सैनिक म्हणून देशाचे संरक्षण करीत असतांना शहीद झालेल्या मु.न्याहळोद येथील हवालदार शहीद मनोहर रामचंद्र पाटील यांच्या वीर पत्नी श्रीमती माया मनोहर पाटील, तसेच मु. चिंचखेडा येथील नायक मनोज लक्ष्मण गायकवाड यांच्या वीर पत्नी श्रीमती रुपाली मनोज गायकवाड यांना मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानपूर्वक ताम्रपट व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेत प्रथम आलेल्या चि. सिद्धांत मनोज मराठे, इयत्ता दुसरी, जिल्हा परिषद शाळा, बाळापूर, तसेच चि.अर्णव सुनिल कुलकर्णी  इयत्ता पाचवी कनोसा कॉन्व्हेंट हायस्कुल, धुळे या विद्यार्थ्यांना मंत्री महोदयांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

  अनुकंपा नियुक्ती आदेशाचे वाटप

स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधून महसुल विभागाच्या अनुकंपा प्रतिक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार तलाठी पदासाठी पात्र ठरलेल्या श्री. यशोदीप अजय जिरे, श्री. मृणाल शरद नगराळे या 2 अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आली.

धुळे पोलीस दलाचे परेड कमांडट मुकेश माहुले यांनी मंत्री महोदयांना मानवंदना दिली. यावेळी मंत्री दादाजी भुसे व इतर मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तंबाखु मुक्तीची शपथ देण्यात आली. जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जगदीश देवपूरकर,वाहीद अली, धुळे आकाशवाणीच्या पुनम बेडसे, जिल्हा आपत्ती व्यस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.

00000