परभणी, दि.१५ (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आजपासून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहेत. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या तपासण्यादेखील मोफत केल्या जाणार आहेत. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे प्रतिपादन गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे संदेशपर बोलत होते.
खासदार संजय जाधव, आमदार सर्वश्री सुरेश वरपुडकर, डॉ. राहुल पाटील, रत्नाकर गुट्टे, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर -साकोरे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तु शेवाळे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
शेकडो वर्षे पारतंत्र्यात असणाऱ्या मातृभूमीस परकीय जोखडातून मुक्त करताना स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सर्वस्व पणास लावलेल्या महापुरुषांना अभिवादन करत देशाच्या व राज्याच्या वैभवशाली परंपरेचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय अर्थव्यवस्थेने नेत्रदिपक प्रगती केली असून भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर पोहचली असल्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. सावे यावेळी म्हणाले.
राज्य शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या लांबल्या असल्यातरी त्याची चिंता करू नये असे सांगून, त्यांनी सन 2023-24 मधील नैसर्गिक आपत्तीमुळे मयत व्यक्तीच्या वारसांना शासनाकडून 9 प्रकरणात 36 लाख रुपये मदत वितरीत केल्याचे सांगितले. तसेच 37 पशुधन मालकांना 14 लाख रुपये मदत दिली असून, मार्च-एप्रिल 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीटीने शेतीपिकांच्या नुकसानीपोटी साडेचार हजार बाधित शेतकऱ्यांना 3 कोटी 12 लाखाहून अधिक राज्य शासनाकडून मदत वितरीत करण्यात आली असल्याचे श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.
केवळ एक रुपयात पिक विमा योजना
सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 च्या सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 कोटी 56 लाख रुपये वितरीत केले असल्याचे सांगून, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 7 लाख 61 हजार शेतकऱ्यांनी खरिपातील विविध पिकांचा केवळ एका रुपयात विमा काढून भविष्यात येणाऱ्या आपत्तींपासून ती संरक्षित केली आहेत. यामध्ये 5 लाख 1 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे संरक्षण होणार असून, हा संपूर्ण हप्ता केंद्र आणि राज्य शासन भरणार आहे. तसेच शेतक-यांना रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देत असल्याचेही त्यांनी आश्वस्त केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच अर्थसंकल्पामध्ये केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपये अनुदान मिळणार आहेत. या योजनेचा फायदा राज्यातील सुमारे 1 कोटी 15 लाख शेतकरी तर परभणी जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 90 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत परभणीत नवीन स्त्री व नवजात रुग्णालयामुळे जिल्ह्यात आरोग्यविषयक सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्या आहेत. सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा मोफत मिळाव्यात, यासाठी परभणी जिल्ह्यात 7 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ सुरु केले असल्याचे ते म्हणाले.
परभणीकरांच्या जनरेट्यामुळे येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यश आले आहे. त्यामुळे येथे 100 विद्यार्थी क्षमतेच्या नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न असलेल्या 430 खाटांच्या रुग्णालयास मान्यता मिळाल्यामुळे त्यांनी परभणी जिल्हावासीयांचे अभिनंदन केले. तसेच राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मासिक मानधनातील 10 हजार रुपये प्रति महिना वाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गंत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति व्यक्ती दीडशे रुपये थेट हस्तांतरण योजनेनुसार लाभ मिळत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेचा जिल्ह्यातील नागरिकांना लाभ होत असून, कोविड महामारीवर मात करून, देश सर्वांगिण विकास करत आहे. त्यामध्ये राज्याच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यासाठी वरदायी ठरु पाहणारा हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे तसेच उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. याच महामार्गास नांदेड-जालना हा द्रुतगती महामार्ग परभणी जिल्ह्यातून जात असल्याचे गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
मेरी माटी – मेरा देश अभियानात सहभागी व्हा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी उपक्रमाची सांगता सुरु झाली असून, मातृभूमीविषयी कायम कृतज्ञता आणि वीरांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण व्हावे, यासाठी देशात ‘मिट्टी को नमन, वीरों को वंदन’ या घोषवाक्यासह ‘मेरी माटी – मेरा देश’ अर्थात ‘माझी माती – माझा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मंत्री श्री. सावे यांनी उपस्थितांना केले
गत 75 वर्षांच्या आश्वासक इतिहासासोबतच देशासमोर अनेक समस्या असल्याचे सांगून शेतकरी, कामगार, व्यावसायिक, दिव्यांगांच्या समस्या आणि स्त्रियांवरील अत्याचार प्राधान्याने सोडवायचे आहेत. यासाठी शासन म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करत आहेच. शिवाय आपण सर्व मिळून सांघिक भावनेने या समस्यांचे निराकरण करू, असा विश्वास व्यक्त करत नवभारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाची एकजुटीने सेवा करण्याचे आवाहन गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.
यावेळी मुख्य ध्वजवंदन कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, वीरपत्नी, वीरमाता, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमानंतर मंत्री श्री. सावे यांनी उपस्थितांना अभिवादन करत स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच स्वातंत्र्य सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांचा सत्कार केला.
*****