ठाणे, दि.१५ (जिमाका) :- गेल्या ७५ वर्षात देशाने मोठी प्रगती केली आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत देशाची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सन २०४७ पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करण्याचे प्रधानमंत्री महोदयांनी सर्व देशवासियांना आवाहन केले आहे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी व देशाला महासत्ता बनविण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान असावे, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन अहोरात्र काम करीत आहे. आपणही सर्वजण मिळून भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प पूर्ण करुया, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा पालघर/सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, पोलीस उपायुक्त श्री. गावडे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल चव्हाण, तहसिलदार युवराज बांगर, संजय भोसले, नीलिमा सूर्यवंशी, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. ग्रामीण पोलीस दलाच्या पथकाने यावेळी राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली. तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.
भाषणाच्या सुरुवातीस मंत्री श्री. चव्हाण यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्मांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. तसेच जिल्ह्यातील नागरिक बंधू-भगिनींना, उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना,पत्रकार बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, राज्य शासनाच्या गेल्या वर्षभराच्या काळात गरीब, वंचित, शेतकरी, युवा, महिला, बेरोजगार अशा सर्वच घटकांसाठी निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र नव्याने घडविण्यासाठी या शासनाने अनेक उपक्रमांना चालना देण्यात आली आहे. हे शासन लोकाभिमुख शासन असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ मिळावा, या दृष्टीने शासन सदैव प्रयत्नशील आहे. शासनाने गेल्या वर्षभरात सामान्य माणसाच्या विकासासाठी व हितासाठीच महत्त्वाचे निर्णय घेतले. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी विकास कामे मार्गी लावत आहोत.
महाराष्ट्राला एक ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच दावोस येथील जागतिक परिषदेत विविध कंपन्यांसोबत करार करून राज्य शासनाने 1.37 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनांसाठी सन 2022-23 मध्ये जिल्ह्याला 618 कोटी रुपयांचे नियतयव्य प्राप्त झाला होता. हा संपूर्ण 100 टक्के निधी जिल्ह्याने खर्च केला आहे. तर सन 2023-24 या वर्षासाठी एकूण 750 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा 132 कोटी रुपयांनी हा निधी जास्त आहे, हे मी आवर्जून सांगू इच्छितो
मुंबईच्या शेजारी असलेला ठाणे जिल्हा हा महत्त्वाचा जिल्हा असून या जिल्ह्याच्या विकासात अनेक आव्हाने आहेत. ठाणे जिल्ह्याचे नागरीकरण झपाट्याने होत असून त्याबरोबरच मुरबाड, शहापूर सारखा आदिवासी भागाचा विकासाकडेही लक्ष देणे आवश्यक ठरते. त्यादृष्टीने विकासाचे नियोजन करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत “हर घर नल से जल” योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. सद्यःस्थितीत ग्रामीण भागात एप्रिल 2023 अखेर 1 लाख 69 हजार 678 कुटूंबाना घरगुती नळ जोडणी देण्यात आलेली आहेत. “हर घर जल” योजनेतून ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात एकूण 700 कामे हाती घेण्यात आली असून यासाठी एकूण रु.715.13 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
ते पुढे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यातून नाशिक, अहमदाबाद, पुणे आदींकडे जाणारे महामार्ग आहेत. या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जिल्ह्यात विविध यंत्रणांच्या माध्यमातून कामे घेण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी उड्डाणपूल, रिंगरोड, मेट्रोचे जाळे विणले जात आहे. या पायाभूत सुविधांना आणखी गती देण्यासाठी राज्याच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पातही तरतूदी करण्यात आल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग तसेच शेजारच्या पालघर जिल्हयातील नागरिकांना आरोग्य विषयक सेवांसाठी ठाण्यामध्येच यावे लागते. त्यामुळे ठाण्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राधान्य दिले आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी उभारले जाणारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर ठाणे शहराच्या आजूबाजूच्या परिसरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी अंबरनाथ येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मंजुरी मिळाली आहे. यामुळे अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर व त्या परिसरातील इतर भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहराच्या विकासासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आली आहेत. देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी, महत्त्वाकांक्षी व ऐतिहासिक समूह विकास योजना (क्लस्टर डेव्हल्पमेंट) ठाणे महापालिका क्षेत्रात मूर्त रुप घेत आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. अनेक वर्षे नागरिक प्रतीक्षा करीत असलेल्या क्लस्टर योजनेच्या प्रत्यक्ष कामास मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे सुरूवात झाल्याने व त्याची अंमलबजावणी कालबद्ध पध्दतीने पूर्ण होणार असल्याने अधिकृत व मालकी हक्काच्या घरात राहण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.
ठाणे शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या आणि नाट्यकर्मी व नाट्य रसिकांची पहिली पसंती असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहातील नूतनीकरणासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
ठाणे महानगरपालिका, जितो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भूमीपूजन नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. बाळकूम येथे ग्लोबल हॉस्पिटलच्या प्रांगणात उभे राहणाऱ्या या हॉस्पिटलसाठी ठाणे महानगरपालिकेने जमीन उपलब्ध करून दिली आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी हे कॅन्सर रुग्णालय संजीवनीच ठरणार आहे.
महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा तंत्रकौशल्यांचा अभ्यास व्हावा तसेच, विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि कला यांचे थेट प्रशिक्षण मिळावे यासाठी ठाणे महानगरपालिका, अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस इनकम्युनिटीज), लर्निंग लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या शाळेतील पहिली ‘थिंक बिग स्पेस’ बाळकूममधील शाळा क्रमांक ६० आणि ११२ येथे सुरू करण्यात आली आहे.
राज्याच्या ‘अमृत’ अर्थसंकल्पात ठाणे जिल्ह्यातील उद्योग व रोजगाराला चालना देण्याची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळावा, उद्योगांना चालना मिळावी, यासाठी नवी मुंबईत भव्य असे जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, असे सांगून मंत्री श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, गेले वर्षभर आपण स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करीत होतो. त्याअंतर्गत “घरोघरी झेंडा” सारखे अनेक उपक्रम राबविले. अमृत महोत्सवाच्या समारोपानिमित्त देशासाठी हुतात्मा झालेल्या वीरांना व वीरांगनांना वंदन करण्यासाठी मा. प्रधानमंत्री महोदयांनी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या अभियानाची घोषणा केली आहे. 9 ऑगस्टपासून देशभर या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातही जिल्हा परिषद, महानगपालिका, नगरपालिकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सुरू आहेत. या अभियानात जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायती, ५ पंचायत समित्या व जिल्हा परिषद तसेच सहाही महानगरपालिकांच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील माती गोळा करून ती दिल्लीला पाठविणे, देशी प्रजातींच्या ७५ वृक्षांची अमृत वाटिका साकारणे, देशासाठी बलिदान दिलेल्या थोर व्यक्तिंच्या नावांचे शिलाफलकाचे अनावरण, स्वातंत्र्यसैनिक, त्यांच्या परिवारातील सदस्य, शहिदांचे कुटुंबिय यांचा सन्मान आदी विविध उपक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी याप्रसंगी केले.
राज्य शासनाने यंदापासून महसूल सप्ताह राबविण्याचे ठरविले होते. त्याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये महसूल सप्ताहनिमित्त युवा संवाद, जनसंवाद, माजी सैनिकांसाठी कार्यक्रम आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. या अंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमधील आवश्यक दुरुस्ती करून जिल्हास्तरावरील 10 लाभार्थ्यांना व तालुका स्तरावर 20 लाभार्थ्यांना आदेश देण्यात आले. तसेच 10 ग्रामपंचायतींना स्मशानभूमी / दफनभूमीची नोंद गाव नमुना नं.7/12 चे इतर अधिकारात घेऊन आदेश वितरित करण्यात आले. या सप्ताहात युवा संवाद कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे सुमारे 3 हजाराहून अधिक दाखल्यांचे एका दिवसात वितरण करण्यात आले. तसेच एक हात मदतीचा अंतर्गत आपत्तीग्रस्त, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना एकूण एक कोटीहून अधिक रक्कमेचे वितरण करण्यात आले. तसेच जनसंवाद कार्यक्रमात महसूल अदालत आयोजित करून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तातडीने करण्यात आला. ठाणे जिल्हा प्रशासनाने महसूल सप्ताहाअंतर्गत चांगले कार्य केले आहे, या शब्दात त्यांनी महसूल प्रशासनाचे कौतुक केले.
ते पुढे म्हणाले, नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांनी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला राज्यभरात उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. ठाणे जिल्ह्यातही शासन आपल्या दारी अंतर्गत विविध तालुक्यांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात 3 लाखांहून अधिक दाखले व इतर लाभांचे वितरण करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्यात आली आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सांगता करीत असताना आपण आपल्या देशाचा वारशांचा गौरव करून देशाची एकात्मता बलशाली करण्याचा व देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगण्याचा संकल्प करूया, असे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी भारत देशाला आत्मनिर्भर व विकसित बनविण्याचे स्वप्न साकार करण्यात हातभार लावण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
स्वातंत्र्य सैनिक/त्यांचे नातेवाईक,उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या अधिकारी/ कर्मचारी/विद्यार्थी/पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सन्मान
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाणे जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे नातेवाईक यांचा मंत्रीमहोदयांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्यांची नावे पुढीलप्रमाणे- दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त, मोतीलाल शंकर धोंगडे, भगवान दलाल या स्वातंत्र्यसैनिकाच्या विधवा पत्नी प्रमोदिनी भगवान दलाल, लजबर खान मखमदुल्ला पठाण यांच्या विधवा पत्नी मरियम लजबरखान पठाण, अनाथबंधू चित्तरंजन चक्रवर्ती यांच्या विधवा पत्नी मिता अनाथबंधू चक्रवर्ती, दयाराम विजयाराम इसरानी यांच्या विधवा पत्नी मीरा दयाराम इसरानी, बाबूराव वामन जेरे यांच्या विधवा पत्नी श्रीमती सुचेता बाबूराव जेरे, गणेश दत्तात्रय पाठक यांच्या विधवा पत्नी सुनंदा गणेश पाठक, जामसिंह राजपूत यांच्या विधवा पत्नी पुष्पादेवी जामसिंह राजपूत, लक्ष्मण फडोळ यांच्या विधवा पत्नी शांताबाई लक्ष्मण फडोळ, नरसिंह यल्लेवार यांच्या विधवा पत्नी चंद्रकला नरसिंह यल्लेवार, यदूनंदनप्रसाद शहा यांच्या विधवा पत्नी कौशल्यादेवी यदूनंदनप्रसाद शहा.
उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या ठाणे जिल्ह्यातील अधिकारी/ कर्मचारी/विद्यार्थी/पत्रकारांचाही जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री ना. श्री. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
केंद्र शासनाकडून गुणवत्तापूर्ण सेवेकरिता पदक घोषित झाल्याबद्दल पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर आस्थापनेवरील अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानित करण्यात आलेल्या अधिकारी/ कर्मचारी/ विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे- ठाणे शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास शिवाजी घोडके(राष्ट्रपती पदक जाहीर), पोलीस उपनिरीक्षक संजय संतोष माळी, ठाणे शहर वाहतूक शाखा पोलीस उपनिरीक्षक वालू शिवराम लभडे,
कर्तव्य बजावताना प्रशंसनीय सेवेबद्दल कल्याण जिल्हा कारागृह उप अधीक्षक तथा प्रभारी अधीक्षक राजाराम रावसाहेब भोसले, ठाणे मध्यवर्ती कारागृह तुरुंगाधिकारी श्रेणी-1 उमरावसिंग प्रताप पाटील, सुभेदार विजय बाबाजी परब, बाळासाहेब सोपान कुंभार, विजय लडकू पाटील (राष्ट्रपती पदक जाहीर), हवालदार गणेश पांडूरंग घोडके (राष्ट्रपती पदक जाहीर), शिपाई स्वाती पांडूरंग गुरव यांचा सन्मान करण्यात आला.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल, नेरुळ, केडीएमसी डायलिसिस सेंटर, तीसगाव यांचा सन्मान करण्यात आला.
पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक परीक्षा राज्य गुणवत्ता यादीतील विशेष प्राविण्यप्राप्त विभूती दत्तात्रय भुंगाळ (इ.5वी, विद्याभवन प्राथमिक स्कूल, मराठी हायस्कूल, नेरूळ नवी मुंबई), आयुष शैलेश भगत (इ.5वी, ओंकार इंटरनॅशनल प्राथमिक स्कूल डोंबिवली), शारव चंदन नानग्रुट (इ.5वी, सुलोचना देवी सिंघानिया स्कूल ठाणे), रोहित अरुण विशे (इ.5वी, जिल्हा परिषद शाळा, साठगाव, शहापूर), रुतिक दिनेश बांगर (इ.8वी, जिल्हा परिषद शाळा, शेलवली बांगर, शहापूर), यश संजय भंगाळे (इ.8वी, साउथ इंडियन सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल, डोंबिवली), श्रेया महेश गाडेकर (इ. 8वी, फादर अॅग्नेल इंग्लिश स्कूल, वाशी, नवी मुंबई), लक्ष चेतन लिमये (इ.8वी, आयईएस चंद्रकांत पाटकर विद्यालय, मराठी माध्यम सेकंडरी, डोंबिवली), या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
राज्य अधिस्वीकृती समिती व विभागीय अधिस्वीकृती समिती 2023 मध्ये ठाणे जिल्ह्यातील मनोज जालनावाला, संजय ज्ञानू मलमे, जयेश सामंत आणि संजय पितळे या पत्रकारांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 5 व्या बटालियनचे इन्स्पेक्टर योगेशकुमार शर्मा यांना विशेष शौर्य पुरस्कार घोषित झाल्याबद्दल मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ला दिल्ली येथील भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक राज्यातून दोन लाभार्थी पती-पत्नीस विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या समारंभास ठाणे जिल्ह्यातील विजय गोटीराम ठाकरे व संगीता विजय ठाकरे या दांपत्यास उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे. हे ठाकरे दांपत्य सत्कार समारंभासाठी दिल्ली येथे उपस्थित होते. याबद्दलही त्यांचे उपस्थित सर्वांनी अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता सुनिल धानके यांनी केले. शेवटी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
0000