क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण

लातूर दि. 15 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात झाला. या सोहळ्यात ध्वजारोहणानंतर क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपिता वीरपत्नी, विविध शासकीय विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत शहीद जवान सुभेदार प्रमोद नारायणराव सूर्यवंशी यांच्या वीरमाता छबुबाई सूर्यवंशी, वीरपिता नारायणराव सूर्यवंशी, वीरपत्नी नंदा प्रमोद सूर्यवंशी यांचा ना. बनसोडे यांच्या हस्ते ताम्रपट देवून सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस विभागातील शहीद जवान पुंडलिक काटकर यांच्या पत्नी कमल काटकर आणि शहीद जवान धनंजय भातलवंडे यांच्या कुटुंबातील सदस्य छाया भातलंवडे यांचाही प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा ना.  बनसोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कृषि विभागाच्या वैयक्तिक लाभार्थी, गट लाभार्थी, सामाईक पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाचे भौतिक व आर्थिक लक्षांक पूर्ण केल्याबद्दल जिल्हा संसाधन व्यक्ती धनंजय पवार यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

लातूर जिल्हा कारागृहातील शिपाई प्रल्हाद शिंदे यांना प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह देवून, तसेच पाणी व स्वच्छता क्षेत्रात गेली दहा वर्षे काम करणारे माहिती व संवाद तज्ज्ञ उद्धव फड यांना ना. बनसोडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

  आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा सन्मान

आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना 2020-2021 अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त औसा तालुक्यातील उटी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, तसेच याच योजनेत 2020-22 मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त लातूर तालुक्यातील कव्हा आणि अहमदपूर तालुक्यातील परचंडा ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांचा क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये पुरस्कार मिळविलेल्या लातूर तालुक्यातील बोपला ग्रामपंचायतीचे सरंपच व ग्रामसेवक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

अमृत महा आवास अभियानात उत्कृष्ट कामगिरीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचा गौरव

अमृत महाआवास अभियानामध्ये उत्कृष्ट कामिगिरी करणाऱ्या औसा पंचायत समितीचा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शिरूर अनंतपाळ पंचायत समितीला द्वितीय, तर चाकूर पंचायत समितीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या अभियानातील सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून औसा तालुक्यातील आलमला ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आणि चाकूर तालुक्यातील चापोली ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतसाठीच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने औसा तालुक्यातील आलमला ग्रामपंचायत, द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी ग्रामपंचायत आणि तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने निलंगा तालुक्यातील बोटकुळ ग्रामपंचायतीचा ना. बनसोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव

राज्य पुरस्कृत आवास योजना योजनेतंर्गत उत्कृष्ट कामिगिरी करणारे औसा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, लातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आणि रेणापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या योजनेतील सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, औसा तालुक्यातील आलमला ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आणि देवणी तालुक्यातील दवणहिप्परगा ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ ग्रामपंचायतीला, द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार लातूर तालुक्यातील वरंवटी ग्रामपंचायतीला आणि तृतीय क्रमांकाचा चाकूर तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला.

जिल्हा पोलीस दलास २४ अद्ययावत मोटारसायकली सुपूर्द

जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून जिल्हा पोलीस दलासाठी 24 अद्ययावत मोटारसायकली प्राप्त झाल्या आहेत. या मोटारसायकली भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस दल अधिक सक्षम व अद्यायवत बनविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून अद्ययावत मोटारसायकलींसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 26 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून प्राप्त झालेल्या 24 मोटारसायकली चार्ली पेट्रोलिंग, पोलीस स्टेशन ड्युटी आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या ताफ्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत.

*****