मुंबई, दि. १७ : राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात सुमारे १२ लाख पुस्तके आहेत. ही ग्रंथसंपदा जतन करण्याबरोबरच भावी पिढीला सहज उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या कामाला गती देऊन कालबद्ध पद्धतीने कामाचे नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
मुंबई विद्यापीठ कलिना परिसरातील नवीन राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या कामाची पाहणी आज मंत्री श्री. पाटील यांनी केली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, उपसचिव प्रताप लुबाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. बनगोसावी, ग्रंथालय उपसंचालक शशिकांत काकड, सहायक संचालक डॉ.विजयकुमार जगताप, ग्रंथपाल संजय बनसोड व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, या राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीचे प्रलंबित बांधकाम पूर्णत्वास आले असून काही किरकोळ कामे राहिलेली आहेत. ती कालबद्ध पद्धतीने नियोजन करून तातडीने पूर्ण करावीत आणि राज्यातील नागरिक व जगभरातील विद्यार्थ्यांसाठी हे ग्रंथालय लवकर उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.
000
काशीबाई थोरात/विसंअ/