मुंबई, दि. १७ : राज्यातील महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत लवकरच एक कृती आराखडा तयार करून सामंजस्य करार करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
मंत्रालयात संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला परिषदेच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, महिला बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघातील महिला परिषदेच्या समन्वयक सुशान जान फरर्ग्युसन, उपसमन्वयक कांता सिंह, राकेश गांगुली उपस्थित होते.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रत्येक महिला वर्गाला व्हावी, महिलांवरील हिंसाचाराला प्रतिबंधासाठी गाव पातळीवर हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी नव्याने गावपातळीवर गावस्तरीय महिला समित्या नेमणे, महिलांना व्यवसायाभिमुख शिक्षण देणे, पर्यटनावर आधारित महिलांसाठी रोजगार निर्मिती करणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, महिलांसाठी विकासाभिमुख योजना राबविण्याबाबत संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषद समवेत लवकरच राज्य कृती आराखडा तयार करेल. राज्यात तो प्रभावीपणे राबविण्यात येईल, असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.
******
संध्या गरवारे/विसंअ/