आदिवासी बांधवांच्या कृषिपुरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘जो जे वांछील ते तो लाहो’ प्रमाणे धोरण – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार  २० ऑगस्ट २०२३ (जिमाका वृत्त) : आदिवासी बांधवांचे  जीवनमान, आर्थिकस्तर उंचावण्यासाठी कृषिपुरक उद्योगांना प्रोत्साहन देत, ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जें वांछील तो ते लाहो,’ या संत ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे जो जे मागेल त्याप्रमाणे व्यवसायासाठी पाठबळ देण्याचे धोरण शासनाने अवलंबले असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते सारंगखेडा (ता. शहादा) येथे  शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांच्या आर्थिक सहाय्याने आवल माता मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, अंतुर्ली यांच्या माध्यमातून, पारंपरिक  मच्छिमारांना विविध मासेमारी साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषद सदस्य अरुण ठाकरे, गुलाब ठाकरे, किशोर नाईक, गुलाल भील, ग्रामपंचायत सदस्या रेखा ठाकरे, प्रविण शिरसाठ, दशरथ ठाकरे,  सदाशिव मिस्तरी,विठ्ठल मोरे, अशोक मोरे,भोजु मोरे,दिलवर मालचे, सागर भील, दशरथ भील व शहादा तालुक्यातील मच्छिमार बांधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी शेतकरी व कष्टकरी बांधवांच्या उत्पन्न वाढीसाठी, ज्या आदिवासी व्यक्तीकडे जमिन आहे, त्यांना कृषि साहित्य, बि-बियाणे उपलब्ध करुन देणे, त्यांच्या शेतात विहिर बांधण्यासाठी अर्थ सहाय्य करणे अशा योजना राबविण्यात येतअसून ज्या आदिवासी व्यक्तींना मच्छिमारी व्यवसाय करावयाचा असेल त्यांना केज फिशिंग सुविधा उपलब्ध करून देणे, ज्यांना जोड धंधा म्हणून दुग्धव्यवसाय करावयाचा आहे, त्यांना दुधाळ जनावरे उपलब्ध करुन देणे, ज्यांना बकरी पालनाचा व्यवसाय करावयचा आहे, त्यांना बकरी उपलब्ध करुन देणे, कृषि व कृषि विषयाशी संबंधित विविध योजना, शासनाचे विभाग व आदिवासी विभागामार्फत विविध योजना सुरू करण्यात आल्या असून आदिवासी बांधवांचे उत्पन्न वाढविणे हा त्यामगचा हेतू आहे.

ते पुढे म्हणाले, आदिवासी भागात वनसंपत्ती विपुल प्रमाणात आहेत. उपलब्ध वनसंपत्तीचा वापर करून प्रक्रिया उद्योगासाठी अनेक महिला बचतगट, उद्योग संस्था पुढे येत आहेत. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या प्रक्रिया उद्योगांसाठी आदिवासी उद्योजकांना आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जात आहे. आदिवासी बांधवांना उद्योजकतेच्या प्रशिक्षणातून व्यवसाय उपलब्ध करून त्यांना आर्थिक सक्षम कसे करता येईल ,यादृष्टीने शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यरत आहे. येणाऱ्या काळात आदिवासी बांधवांनी प्रक्रिया उद्योगातून तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मत्स्य प्रक्रिया उद्योगाला चालना देणार – डॉ. हिना गावित

भारतात मोठ्या प्रमाणावर मत्स्य व्यवसाय फोफावला असून, पारंपरिक पद्धतीने वाढीस लागलेल्या या समृद्ध व्यवसायात आंतरराष्ट्रीय पातळींवर निर्यातीलाही सुरूवात झाली आहे. येणाऱ्या काळात मत्स्य प्रक्रिया उद्यागाला मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याने त्याला प्रोत्साहन व चालना देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार डॉ. हिना गावित यांनी यावेळी बोलताना सांगितले.

०००