‘मेरी माटी मेरा देश’, उपक्रमाला गावागावात राष्ट्रभक्तीची साथ ७६४ गावांमध्ये शीलाफलकाची उभारणी

नागपूर दि.22 : माझी माती माझा देश (मेरी माटी मेरा देश) या अभियानाला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये 764 ग्रामपंचायतीमध्ये शीलाफलक लावण्यात आले आहे. याशिवाय या काळात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण देखील करण्यात आले आहे.

‘मेरा मिट्टी मेरा देश’, हा हा उपक्रम 9 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे.या उपक्रमाची सुरुवात 9 ऑगस्टला पंचप्राण शपथ ग्रहण करून जिल्हा परिषद नागपूर व नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत सर्व 13 पंचायत समितीमध्ये मोठ्या उत्साहाने करण्यात आली होती. स्वातंत्र्य दिनापर्यंत सर्व गावांमध्ये राष्ट्र प्रेमाने भारलेले वातावरण यामुळे निर्माण झाले.

गावागावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून शिलाफलक लावण्यात आले आहे. यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश, त्या त्या परिसरातील शहीद,स्वातंत्र्य सैनिक, विविध युद्धामध्ये शहीद झालेले सैनिक यांच्या संदर्भातील माहिती अंकित केली आहे. जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार 764 ग्रामपंचायतमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला असून कायमस्वरूपी छोटे स्मारक उभारण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्यसैनिक, सैन्य दलातील जवान, विविध दलात कार्यरत देशसेवेतील कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे सोहळे गावागावात पार पडले. त्यामुळे गावातील नवतरुणांना गावातील स्वातंत्र्य सैनिकांची ओळख झाली.

शीलाफलक लावणे, अमृत वाटिका तयार करणे, वसुधा वंदन, पंचप्राण शपथ, ध्वजारोहण, असा पाच मुद्द्यांवरील या उपक्रमामुळे वातावरण निर्मितीत मदत झाली आहे. गावागावातून अमृतकलश तयार करण्यात आले असून त्यामध्ये प्रत्येक गावातील माती भरून ठेवण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटल्याची माहिती या उपक्रमाचे जिल्हास्तरीय समन्वयक राजनंदिनी भागवत यांनी दिली आहे.