औरंगाबाद, दि. 22 (जिमाका) – बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना हमखास उत्पन्नाची हमी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी यावी यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवडीला चालना दिली असून शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी पुढे यावे,असे आवाहन राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज येथे केले.
‘बांबू लागवड’, या विषयावर आज तापडीया नाट्यगृहात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास बांबू वृक्ष लागवड समितीचे सदस्य पाशा पटेल, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, उपायुक्त रोहयो डॉ.अनंत गव्हाणे, अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी अर्चना खेतमाळीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नंदनवनकर, सरपंच, रोजगार सेवक आणि तालुका स्तरावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री भुमरे म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्या राज्यामध्ये औरंगाबाद ,लातूर आणि सातारा या तीन जिल्ह्याची पथदर्शी प्रकल्पासाठी निवड केली आहे. जिल्ह्यात बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. बांबू उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता येईल. शेतकऱ्यांना रोजगार मिळेल.
पालकमंत्री भुमरे पुढे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये रोहयोअंतर्गत शेततळे, विहिरी, गाय गोठे बांधकाम, कांदा चाळ, शेततळ्याचे अस्तरीकरण यासारख्या योजना बरोबरच अंगणवाडीचे बांधकाम आणि प्रत्येक शाळेला कुंपण यासारख्या अभिनव बाबींचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे, जिल्ह्यातील ग्रामिण भागातील विकासाला चालना मिळाली आहे. रोहयोतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन गावांचा विकास होत आहे. मातोश्री पाणंद रस्ता योजनेमुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणे येणे, शेतातील मालाची वाहतूक करणे सोईचे होत असून शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी महत्वपूर्ण ठरत आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेअंतर्गत काम झालेले असून याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे, असे भुमरे यांनी सांगितले. रोहयोत समावेश केल्याने बांबू लागवडीलाही चांगली चालना द्यावी. बांबू लागवडीमुळे शेतकरी आर्थिक संपन्नता साधू शकतो, असा विश्वास पालकमंत्री भुमरे यांनी व्यक्त केला.
प्रारंभी बांबू लागवड क्षेत्रातील तज्ज्ञ संजीव करपे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बांबू लागवड, बाजारपेठ, उत्पादन, उपयोग, आणि यावरील मार्गदर्शन यावर संजीव करपे यांनी सविस्तर सादरीकरण व मार्गदर्शन केले. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत बांबू वृक्ष लागवड समितीचे सदस्य पाशा पटेल यांनीही शेतकऱ्यांना बांबूपासून तयार होणारी विविध उत्पादने, बांबूचे विविध क्षेत्रातील उपयोग, त्याचे अर्थकारण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, कर्मचारी आदी सहभागी झाले होते.
000