सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून वस्तू व सेवा कर भवनाच्या कामाची पाहणी

मुंबई, दि. २३ : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज वडाळा (मुंबई) येथील निर्माणाधीन वस्तू व सेवा कर भवन इमारतीची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, वस्तू व सेवा कर विभाग, तसेच संबंधित कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

वस्तू व सेवा कर भवन, कार्यालय,  प्रशिक्षण प्रबोधिनी, महाराष्ट्र शासनाचे विविध कार्यालय, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवासस्थाने आदींची उभारणी या ठिकाणी होत आहे. या संपूर्ण कामाची सादरीकरणाद्वारे माहिती मंत्री श्री. भुसे यांनी वडाळा येथील प्रकल्पस्थळी आयोजित बैठकीत घेतली.  त्यानंतर प्रत्यक्ष कामाची पाहणीसुद्धा केली. पाहणीदरम्यान काम विहीत कालमर्यादेत, गुणवत्तापूर्ण व कामगारांच्या सुरक्षेच्यादृष्टीने विविध उपाययोजना राबवून पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी कामाची माहिती दिली.

वस्तू व सेवा कर भवन कामाच्या सादरीकरणानंतर वांद्रे ते वर्सोवा या स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी मार्ग कामाचे सादरीकरण करण्यात आले.  सादरीकरण दरम्यान वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्गावरील प्रत्यक्ष झालेले काम,  खर्च, भविष्यातील कामाचे नियोजन, मुख्य सागरी रस्त्याला  जोडणारे जोडणी रस्ते आदींची विस्तृत माहिती मंत्री श्री.  भुसे यांनी यावेळी घेतली.

००००

निलेश तायडे/विसंअ/