‘चांद्रयान’ मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्स्फूर्त भावना

मुंबई दि. २३: भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे चांद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त भारतीयांचे आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. भारताच्या चांद्रयानाचे विक्रम हे लँडर यशस्वीरित्या उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या. इस्त्रोच्या कमांड सेंटरमधून सुरु असलेले प्रक्षेपण वर्षा निवासस्थानी  मुख्यमंत्र्यांनी पाहिले. मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्वानीच आनंदाने टाळ्या वाजवून ही मोहीम फत्ते झाल्याबद्धल आनंद साजरा केला. तसेच उपस्थितांना पेढेही वाटण्यात आले

मुख्यमंत्री म्हणतात की, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे…  या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांचं हे यश आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचं आणि पाठिंब्याचं बळ शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहे. श्रीहरीकोटा येथून १४ जुलैला ‘चांद्रयान ३’ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. अनेक अवघड टप्पे त्याने यशस्वीपणे पार केले.  चांद्रयान ३’ कडून वेळोवेळी पाठवण्यात आलेली छायाचित्रे आणि यानाची सकारात्मक प्रगती ही आजच्या या यशाची ग्वाही देत होते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की,  भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे.

परवा रशियाचे ‘लुना-२५’ यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळले होते, त्या पार्श्वभूमीवर आज ‘चांद्रयान ३’ चे यश हे संपूर्ण जगात उजळून निघाले आहे असेही मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात.

000