शासकीय योजनाचा लाभ मिळाल्याने आनंद; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त

परभणी दि.27 (जिमाका): ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या गतिमान अंमलबजावणीमुळे आम्हाला शासनाच्या योजनांचा  थेट लाभ मिळाला. कुणाला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तर कुणाला घर मिळाले, कुणाला शेती तर कुणाला श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळाला. योजनेच्या लाभातून जगण्यास बळ व उभारी मिळाली, अशा भावना शेतकरी, शेतमजूर, महिला, शाळकरी विद्यार्थी, वृद्ध महिला यांनी ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमात आलेल्या लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या.

मी सेलू गावात राहतो. माझे आई वडील, पत्नी व मुले मिळून सहा लोकांचे एकत्रित कुटुंब आहे. पूर्वीपासून पत्र्याच्या घरात कुटुंबासह राहत होतो. राज्य शासनाने मला रमाई आवास योजनेतून घरकुल योजनेचा लाभ दिला आणि मी पत्र्याच्या घरातून टुमदार सिमेंटच्या घरात आलो. आज खूप आनंद झाला असून मी शासनाला मनापासून धन्यवाद देतो. – विकास प्रभाकर धापसे, सेलू जि.परभणी

मी पूर्वी दुसऱ्याच्या शेतात मजुरी करत होतो. शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतून चार एकर शेती मिळाली. आज मी या चार एकर शेतीत कापूस व सोयाबीन पीक घेतले आहे, आम्ही घरीच संपूर्ण काम करतो, आता दुसऱ्याच्या शेतीत मजुरी करण्याची गरज नाही.

– घनश्याम मधुकर रणखांबे, कुंभारी, ता. मानवत, जि.परभणी

समाजकल्याण कार्यालयाकडून मला मिळालेल्या तृतीयपंथी ओळखपत्रामुळे जगण्याला उभारी मिळाली. आमच्यासारख्या दुर्लक्षित घटकाला कागदपत्रे मिळू लागली आहेत. त्यामुळे आम्ही समाजाच्या मुख्य प्रवाहात आलो आहोत. – अमिता रौफ बक्श, परभणी

मला सेलू तहसील कार्यालयाकडून श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतून लाभ मिळाला. आता महिन्याला 1500 रुपये निवृत्ती वेतन मिळेल. तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मला सहकार्य केले. शासनाचे आभार मानते. – कमल मोतीराम जोहरुले, कोथळा ता. मानवत, जि.परभणी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थांना भोजन व निवासाची सोय व्हावी म्हणून रोख रक्कम माझ्या बँक खात्यात मिळते. या योजनेच्या पैशातून मला माझे घर सोडून शिक्षण घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे  मला डॉक्टर होण्यासाठी ही मदत मोठा आधार ठरत आहे.

–  कु.तनुजा संजय तायडे, पी. डी. जैन होमिओ महाविद्यालय परभणी